शहर

युती सरकारची कामे घराघरात पोहोचवा – शिवेसेना सचिव किरण पावसकर 

मुंबई :

राज्यात महायुतीने आणि केंद्र सरकारने देशात मागील १० वर्षांत लोकहिताची अनेक कामे केली आहेत. ही कामे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरांत पोहचवली तर विजय आपलाच आहे, असा विश्वास शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी व्यक्त केला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी किरण पावसकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आपण सर्वांनीच समाजात आणि राजकारणात काम केले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराबाबत कार्यकर्त्याला काही वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु कार्यकर्त्यांनी सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा जगाला हेवा वाटत आहे. आपल्या सरकारने जनतेसाठी अनेक चांगल्या सुखसोई उपलब्ध केल्या आहेत. दहा वर्षात झालेली कामे जनतेपर्यंत योग्य प्रकारे पोहोचल्यास विरोधी पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही, असे पावसकर यांनी सांगितले.

पालिकेवर २४ वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांचे घोटाळे जनतेसमोर मांडा

मागील २४ वर्षांत मुंबईतून अनेक उद्योग बाहेर गेले. सफाई कामगारांच्या मुलांच्या नोकरीचे २० हजार अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. इतकी वर्ष पालिकेत ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी मुंबईकरांसाठी काय केले, असा सवाल करत पावसकर यांनी उबाठा गटावर निशाणा साधला. महापलिका निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार अशी बेताल वक्तव्य वांद्रे पूर्वेतून येतात, असे त्यांनी सांगितले. पत्राचाळ घोटाळा, कोव्हीडमधील खिचडी घोटाळा याबाबत मतदारांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवली तर मुंबईत विधानसभा निवडणुकीवेळी वेगळे चित्र असेल असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *