मुंबई :
“मतदान करा हो…मतदान करा…नागरिक हो मतदान करा..,” अशी साद एसएनडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्यातून मुंबईकरांना घातली. निमित्त होते, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मतदानाच्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसएनडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी विद्यापीठ परिसरात ‘मतदान अमूल्य दान’ या पथनाट्यातून जनजागृती केली.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘स्वीप’च्या शिक्षण – विस्तार विभाग आणि एसएनडीटी विद्यापीठाच्या सामाजिक कार्य विभागातर्फे या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. नव मतदारांनी नोंदणी कशी करावी, डिजीटल पद्धतीचा वापर करून आपले नाव नोंदविल्याची खात्री कशी करावी, मतदार नोंदणी विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी १९५० या मतदार मदत क्रमांकाचा वापर करावा. तसेच लोकशाहीचे संवर्धन आणि जतन करण्याच्या राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्यासाठी तरूणांचा सहभाग महत्वाचा आहे. आजचे तरुण हेच भारताचे भविष्य असल्याचा संदेश या पथनाट्याद्वारे देण्यात आला. तुमचे एक मत ठरेल, देशाचे बहुमत…हा संदेश पथनाट्यातून देत…युवकांनी मित्रांचे आणि परिवाराचेही मतदानासाठी प्रबोधन करीत मतदानाचा आपला हक्क बजावण्याचा संदेश या पथनाट्याद्वारे देण्यात आला.
चर्चगेट विद्यापीठ परिसरात आयोजित पथनाट्य सादरीकरणावेळी कुलगुरू प्रा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव, प्र. कुलगुरु प्रा. रबी ओझा, सामाजिक कार्य विभागाचे संचालक प्रा. प्रभाकर चव्हाण, अधिष्ठाता प्रा. मेधा तापियावाला, विद्यापीठाच्या स्वीपच्या मुख्य नोडल अधिकारी प्रा. मनीषा माधवा, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००