मुंबई :
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी समान नगरी कायदा व्हायला हवा, असे ठणकावून सांगितले होते. पण काँग्रेसने जाहीरनाम्यात पर्सनल लॉ कायद्यात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. समान नागरी कायद्याला विरोध आणि समलिंगी कायद्याचे समर्थन करणारा कॉंग्रेसचा जाहीरनामा उबाठा गटाला मान्य आहे का? यावर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे खुले आव्हान शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी आज दिले.
शिवसेना पक्षाचे कार्यालय बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी उबाठा गटावर हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर घेऊन जाण्याची ज्यांची लायकी नाही, त्यांना तिथे घेऊन गेलात आणि शिवतीर्थावर हिंदुत्वाचा उच्चार करु शकला नाहीत. बाळासाहेबांच्या ध्येय धोरणांचा तत्वांचा जर अपमान होत असेल तर उबाठाने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरू नये, बाळासाहेबांच्या फोटोवर त्यांनी मते मागू नयेत, अशी टीका पावसकर यांनी केली.
बच्चा नसून सच्चा, तुमच्या सारखा लुच्चा नाही
भाजप स्थापना दिनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर बोलताना पावसकर म्हणाले की, विकास कामांच्या जोरावर डॉ.श्रीकांत शिंदे भरघोस मतांनी निवडून येतील. त्यांना आजोबा आणि वडिलांचे नाव सांगत फिरावे लागणार नाही. डॉ. श्रीकांत शिंदे हे बच्चा नसून सच्चा कार्यकर्ता आहे, तुमच्या सारखा लुच्चा नाही असा प्रतिहल्ला पावसकर यांनी संजय राऊत यांच्यावर केला. आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून लढण्याची घोषणा केली होती. त्यांनी आता आमदारकीचा राजीनामा देऊन कल्याणमधून निवडणूक लढवावी असे प्रतिआव्हान पावसकर यांनी दिले.
नाशिक, रत्नागिरी- सिंधुदुर्गवर दावा कायम
नाशिक, रत्नागिरी- सिंधुदुर्ग या मतदारसंघाचे निर्णय महायुतीचे सर्वोच्च नेते लवकरात लवकर घेतील. नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा कायम असल्याचा पुनरुच्चार यावेळी पावसकर यांनी केला.