आरोग्य

जी. टी. रुग्णालयाचा शतकोत्तर सुवर्ण वर्ष सोहळा उत्साहात

मुंबई :

स्वतः त्याकाळी क्षयरोगासारख्या असाध्य व्याधीने आजारी असताना लोकसेवेचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून गोकुळदास तेजपाल यांनी दीड लाख रुपयांची देणगी दिली. तेव्हापासून सुरु झालेला रुग्णसेवेचा हा वसा येथील डॉक्टरांनी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जपला आहे. कोरोना संसर्गाच्या लाटेमध्ये या रुग्णालयाने न डगमगता शेकडो कोविड रुग्णांना वैद्यकीय उपचार देऊन जीवनदान दिले. ५२१ खाटांची ऐतिहासिक वासरा लाभलेली ही वास्तू आज १५१ व्या वर्षामध्ये प्रवेश करते आहे हा वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाचा दिवस असल्याचे प्राजंळ मनोगत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जी. टी. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र संकपाळ, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भालचंद्र चिखलकर, जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर तसेच जी.टी. रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला.

मुंबई जिल्हाधिकारी पदाचा पदभार २०२० मध्ये स्वीकारला आणि लॉकडाऊन लागले. त्यावेळी जी. टी. रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केले. येथील कर्मचारी, डॉक्टर यांनी रुग्णांची अहोरात्र सेवा केली. त्याबद्दल कर्मचारी व डॉक्टरांचे आभार मानण्याची संधी मला या कार्यक्रमामुळे मिळाली आहे, अशी भावना वैद्यकीय शिक्षण आय़ुक्त राजीव निवतकर यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि माझ्या कार्यक्षेत्रात जी. टी. महाविद्यालय उभे राहत आहे, त्याचा अभिमान आहे. रुग्णालयाची आता महाविद्यालयाच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीबद्दल त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

जी. टी. रुग्णालयामध्ये मी रजिस्टार म्हणून काम केले आहे. त्यावेळी जे.जे. रुग्णालयाच्या तुलनेत जी. टी. रुग्णालयात काम कमी होते. परंतु बरेच शिकायला मिळतं होते. येथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या रुग्णालयात उपचारासाठी येत असे. पण घरांच्या जागेत बऱ्याच प्रमाणात व्यावसायिक गाळे सुरू झाले असल्याने रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच जी. टी. रुग्णालयातील कॅन्टीन ही जे.जे., सेंट जॉर्जेस आणि कामा रुग्णालयाच्या तुलनेत खूपच चांगली होती. त्यामुळे जी. टी. रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील खाल्ल्यानंतर जर तुमचे वजन वाढले नाही तर तुमची क्षयरोग चाचणी केली पाहिजे असे. आम्ही गमतीने म्हणत असे, अशी आठवण जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी यावेळी सांगितली. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून ज्यांना दूर लोटण्यात येते अशा राज्यामधील तृतीयपंथीना अद्ययावत आरोग्यसेवा मिळावी यासाठी पहिला सुसज्ज वॉर्ड येथे सुरु करण्यात आला. आता नव्या वैद्यकीय उपकारणासह सुसज्ज प्रयोगशाळेचीही रुग्णांना निश्चितपणे मदत लाभेल याकडे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भालचंद्र चिखलकर यांनी लक्ष वेधले.

कर्मचाऱ्यांचा सत्कार

जी. टी रुग्णालयाच्या १५० व्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने भरवलेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये कामा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी जेतेपद पटकावले. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यातील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *