शहर

उन्हाळ्यातील संभाव्य रक्त तुटवड्यावर मात करण्यासाठी रक्तदान शिबिरे भरविण्याचे रक्तपेढ्यांना आवाहन

मुंबई :

एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना असणाऱ्या सुट्ट्या आणि बरेच रक्तदाते हे सुट्टीनिमित्त बाहेरगावी जातात. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होत असतो. या पार्श्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या नियोजनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र पुढील दोन महिन्यांतील संभाव्य रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना दिल्या आहेत.

महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्वाचा स्त्रोत आहे. मात्र मार्चमध्ये शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा असता. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यांमध्ये महाविद्यालय व शाळांना सुट्ट्या असतात. त्यामुळे बरेच नागरिक गावाला किंवा फिरण्यासाठी बाहेर गावी जातात. यामध्ये युवा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने बरेचसे रक्तदातेही बाहेरगावी जातात. त्यामुळे रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे प्रमाण घटते. परिणामी दरवर्षी एप्रिल ते मे या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यातच यंदा असलेल्या निवडणुकांचा कालावधी यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने फेब्रुवारीपासून रक्त संकलनाचे नियोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्यभरात ८४७ रक्तदान शिबिरांमार्फत ७८ हजार २२१ युनिट रक्त संकलित झाले. राज्यभरामध्ये दररोज साधारण पाच हजार युनिट रक्ताची आवश्यकता भासते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रक्तदान कमी झाल्यास रक्ताचा संभाव्य तुटवडा होण्याची शक्यता आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील रक्ताच्या संभाव्य तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना सामाजिक, धार्मिक संस्थांना संपर्क करुन स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिल्या आहेत.

रेल्वे स्थानके व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये करणार संकलन

शासकीय रक्तपेढ्यांनी रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. तसेच गृहनिर्माण सोसायटीमध्ये रक्त संकलन वाहन पाठवून रक्त संकलन करण्यावर देखील भर द्यावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *