मुंबई :
निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रांवरील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तसेच मतदारांना मार्गदर्शन करणे, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांवर सहकार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये एन.एस.एस., एन.सी.सी., स्काऊट, आर.एस.पी आणि इतर इच्छुक विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे.
निवडणुकीच्या कामासाठी विविध सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असताना आता मतदान केंद्रावर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना मदत करण्यासांठी १८ वर्षाखालील म्हणजेच एन.एस.एस., एन.सी.सी., स्काऊट, आर.एस.पी आणि इतर इच्छुक विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षक निरिक्षक कार्यालयाने मुंबईतील सर्व मान्यताप्राप्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तसेच मतदारांना मदत करण्यासाठी इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची नावे व संबधित विषयाचे शिक्षक यांची नावे सादर करण्याचे आदेश शिक्षण निरिक्षक कार्यालयाने दिले आहेत.
विद्यार्थ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळा
एप्रिल-मे महिन्यात मुंबईसह राज्यात उष्णतेच्या तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या कडक उन्हाचा तडाखा विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी शाळांकडून विद्यार्थ्यांची नावे मागवू नयेत, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहे.