आरोग्य

निर्धन व दुर्बल घटकांसाठी धर्मादाय रुग्णालयात १२ हजार खाटा

रुग्णांना उपचारापासून वंचित न ठेवण्याच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले यांच्या सूचना

मुंबई : 

राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांकडू विविध कागदपत्रे मागण्यात येतात. मात्र कागदपत्रांअभावी निर्धन व दुर्बल घटकातील कोणताही रुग्ण उपचाराअभावी वंचित राहू नये. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये दुर्बल व निर्धन घटकांसाठी जवळपास १२ हजार खाटा असल्याने आर्थिक विषमतेवर आधारित वैद्यकीय उपचार असू नयेत. रुग्णांना योग्य व तात्काळ उपचार मिळावे हे आपले पहिले कर्तव्य असले पाहिजे असे मत विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले यांनी व्यक्त केले आहे.

धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केला आहे. या मदत कक्षाबाबत राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना माहिती देण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे विधी व न्याय विभाग व धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत एक दिवसीय प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रुग्णालयातील प्रतिनिधींचे समस्यांचे निवारण करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयांतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आनंद बंग, डॉ. तुपकरी, भरत गायकवाड सहाय्यक धर्मादाय आयुक्त डॉ. गौतम बंन्साळी, मुंबई, ठाणे, नाशिक विभागातील धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या १० टक्के राखीव खाटाच्या माध्यमातून रुग्णांना योग्य व दर्जेदार उपचारासाठी मदत करता येईल, यासाठी दक्षता कमिटी रुग्णांवर व संबंधित रुग्णालय यामध्ये समन्वय साधणार असल्याचे श्रीकर परदेशी यावेळी म्हणाले. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांची संख्या जवळपास ४६८ इतकी आहे. या रुग्णालयांमध्ये निर्धन रुग्णांसाठी ६ हजार तसेच दुर्बल घटकांसाठी सहा हजार अशा एकूण १२ हजार खाटा आहेत. यामुळे एक ही गरजू रूग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही याची काळजी कक्षाच्या माध्यमातून घेतली जाईल असे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले.

प्रत्येक व्यक्तीला संविधानाच्या मध्यातून मुलभूत हक्क देण्यात आले आहेत. यामध्ये चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा सुविधा मिळवणे, हे प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात उपचार देण्याचे काम राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष करणार असल्याचे अमोघ कलोती यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांचे आभार शरद घावटे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *