मुंबई :
हृदयविकारांच्या झटक्यासह हृदयविकाराच्या विविध आजारांवरील रुग्णांवर कॅथलॅबद्वारे उपचार केले जातात. जे.जे. रुग्णालयामधील दोन्ही कॅथलॅब यंत्रे जुनी झाल्याने रुग्णांना दीड महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र महिनाभरापूर्वी जे.जे. रुग्णालयामध्ये नव्याने आणण्यात आलेल्या कॅथलॅब यंत्रामुळे रुग्णांवर उपचार करण्याचा वेग वाढला असून, महिनाभरामध्ये १०० पेक्षा अधिक रुग्णांच्या हृदयावर उपचार करण्यात आले आहेत. यामुळे प्रतीक्षा यादी दीड महिन्यांवरून आठवड्यावर आल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
मधुमेह, उच्च रक्तदाब, वृद्ध नागरिक यांच्याबरोबरच बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी करण्यात येते. अनेक बालकांमध्ये जन्मत:च हृदयात छिद्र असण्याबरोबरच त्यांना हृदयविकारही जडलेला असतो. काही रुग्णांच्या हृदयाच्या झडपा बंद किंवा खराब झालेल्या असतात अशा हृदयाशी संबंधित आजाराने ग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी कॅथलॅब यंत्र आवश्यक असते. जे.जे. रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन कॅथलॅब यंत्र आहेत. मात्र ही यंत्रे जुनी झाल्याने रुग्णांवर उपचारासाठी विलंब होत असे. रुग्णांना उपचारासाठी दीड महिने प्रतीक्षा करावी लागत असे. खाजगी रुग्णालयात अँजिओप्लास्टीसाठी तीन ते पाच लाख रुपये इतका खर्च येतो. हा खर्च सामान्यांना परवडणारा नसतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अँजिओप्लास्टिसाठी सुमारे ६५ हजार रुपये आकारण्यात येत असून पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले जातात.
रुग्णांच्या उपचारासाठी होत असलेला विलंब लक्षात घेता जे.जे. रुग्णालयामध्ये महिनाभरापूर्वी नवीन कॅथलॅब यंत्र आणण्यात आले. याचा फायदा अँजिओप्लास्टी, रक्ताच्या गुठळ्या काढणे, कोरोनरी थ्रोम्बेक्टॉमी, स्टेंटिंग, एथेरेक्टॉमी, कार्डियाक कॅथेटेरायझेशन, पेसमेकर, बलून वाल्व्ह्युलोप्लास्टी, कार्डिओव्हर्जन, व्हॉल बदलणे अशा शस्त्रक्रियांचा वेग वाढला. नवीन कॅथलॅब यंत्रामुळे दिवसाला १० ते १२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. त्यामुळे मागील महिनाभरामध्ये या नवीन कॅथलॅब यंत्रामुळे १०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. नव्या यंत्रामुळे एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारणपणे दीड ते दोन तास लागत आहे. तसेच या यंत्रामुळे रुग्णांचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी दीड महिन्यांवरून आठवड्यावर आला आहे. त्यामुळे जे.जे. रुग्णालयामध्ये हृदयावरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
अपेक्षेप्रमाणे नवीन यंत्राचा प्रतिसाद
नवीन यंत्राची उत्तम प्रतिमा गुणवत्ता, कमी किरणोत्सर्ग आणि सलग १० ते ११ तास सुरू राहण्याची क्षमता यामुळे अधिक रुग्णांवर उपचार करता येत आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचाराचा कालावधी दीड महिन्यांवरून आठवड्यांवर आला आहे. जे.जे. रुग्णालयाकडून आणखी एक कॅथलॅब यंत्राचा प्रस्ताव सादर केला असून, हे यंत्र मिळाल्यास उपचाराचा कालावधी कालावधी आठवड्यावरून पाच दिवसांपर्यंत कमी करण्यात येईल, अशी माहिती जे.जे. रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. कल्याण मुंढे यांनी दिली.
जे.जे. रुग्णालयासाठी आणखी एक कॅथलॅब यंत्र खरेदी करण्यात येणार आहे. परंतु ही खरेदी निविदा प्रक्रियेत अडकली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास रुग्णालयाला आणखी एक उच्च दर्जाचे कॅथलॅब यंत्र मिळेल व अधिक रुग्णांवर उपचार करणे सोपे होणार आहे.
– डॉ. कल्याण मुंडे, हृदयरोग विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय