मुंबई :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे १९२३ ला सादर केलेल्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी : इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन’ या पीएचडी प्रबंधाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज लंडन येथे ‘शाश्वतता, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. बी. आर. आंबेडकर’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी लॅरी क्रामेर, अध्यक्ष आणि कुलगुरू लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लॉर्ड निकोलस स्टर्न, आयजी पटेल प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स अँड गव्हर्नमेंट अँड को-चेअर इंडिया, डॉ. रुथ कुट्टुमुरी, को-चेअर इंडिया ऑब्झर्वेटरी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, बार्टीचे महासंचालक श्री. सुनील वारे, लंडन स्थित अभ्यासक आणि अनिवासी भारतीय श्री. गंगावणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. मनिषा करणे, सुजीत घोष, उपउच्चआयुक्त, भारतीय उच्चआयुक्तालय, डॉ. शंतनू सिंह, संशोधक, इंडिया ऑब्जर्वेटरी, डॉ. सुप्रिया कामथ, डॉ. नियथी कृष्णा, एलिजाबेथ रायन आणि मानस गोयल यांच्यासह विविध मान्यवर आणि लंडन आणि भारतातून ६४ संशोधक उपस्थित होते. मलेशिया सभागृह, सेंटर बिल्डिंग लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, लंडन येथे हा उदघाटन सोहळा पार पडला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या विशेष पुढाकारातून या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, ही परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व त्यांच्या प्रबंधाच्या शताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथे आयोजित व्हावी यासाठी ते मागील वर्षभरांपासून प्रयत्नशील होते.
१३ आणि १४ एप्रिल २०२४ या दरम्यान आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘शाश्वतता, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. बी. आर. आंबेडकर’ या विषयाच्या अनुषंगाने देश-विदेशातील अनेक संशोधक, प्राध्यापक आणि मान्यवर सादरीकरण करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान, शिष्यवृत्ती, ज्ञान आणि समकालीन संशोधन आणि आर्थिक धोरणांशी त्यांची प्रासंगिकता यावर शंशोधक आणि धोरणकर्त्यांना या परिषेदेच्या माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘आंबेडकर्स कॉन्ट्रीब्युशन्स टू इंडियन इकॉनॉमिक रिफॉर्म’, ‘कास्ट अँड सोशल जस्टीस’, ‘इंटरसेक्शनल इनइक्वॅलीटीज्’, ‘आंबेडकर्स व्हिजन ऑन एज्युकेशन, लिटरेचर अँड कल्चर’ अशा चार सत्रात विविध संशोधक त्यांच्या विषयांचे सादरीकरण करणार आहेत. तर समारोपीय सत्रासाठी माल्दोवाच्या माजी पंतप्रधान नतालिया गॅव्रिलिटा, लॉर्ड मेघनाथ देसाई, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, इंडो ब्रिटीश ऑल पार्टी पार्लियामेंटरी ग्रुप चेअरचे विरेंद्र शर्मा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या वतीने सहभागी झालेले शिष्टमंडळ हे कँब्रिज विद्यापीठ (ट्रीनिटी कॉलेज), लंडन विद्यापीठ, झोरास्ट्रीयन इन्स्टीट्यूट, युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहम, युनिव्हर्सिटी ऑफ रिडींग येथे शैक्षणिक सामंजस्य आणि सहकार्य संधीसाठी भेटी देणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.