शहर

१३ हजार एसटी बसमध्ये लागलेली व्हीटीएस प्रणाली लालफितीमुळे ठरतेय कुचकामी

एसटीच्या सर्व गाड्यांमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा (व्हीटीएस) लागली असून यामुळे एखादी गाडी नेमकी कुठपर्यंत पोहोचली याचा माग काढता येऊ शकत होता. परंतु एसटीच्या लालफितीच्या कारभारामुळे हे ॲप विकसित होण्यापासून रखडले आहे.

मुंबई : 

आगारात किंवा मुख्य स्थानकातून सुटलेल्या गाडीची वाट पाहत तिष्ठत उभे राहिलेल्या प्रवाशांना दिलासा मिळावा म्हणून गाडीचा ठावठिकाणा बसल्या जागी समजू शकेल असे ऑनलाईन ॲप एसटी ने विकसित करण्याचे ठरविले होते.त्यासाठी एसटीच्या सर्व गाड्यांमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा (व्हीटीएस) लागली असून यामुळे एखादी गाडी नेमकी कुठपर्यंत पोहोचली याचा माग काढता येऊ शकत होता. परंतु एसटीच्या लालफितीच्या कारभारामुळे हे ॲप विकसित होण्यापासून रखडले आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना आगाऊ तिकीट काढून देखील मुख्य बस स्थानकावरून सुटलेल्या बसचा ठिकाण समजू शकत नाही. दुर्दैवाने त्यांना तासंतास रस्त्यावर बसची वाट पाहत बसावे लागते.

एसटीचा वक्तशीरपणा वाढून वेळापत्रक सुधारावे, प्रवाशांना बसची सद्यस्थीती समजण्यास मदत व्हावी तसेच बसचा अपघात झाल्यास त्याची माहिती महामंडळाला त्वरीत मिळावी यासाठी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये व्हीटीएस प्रणालीचा शुभारंभ केला होता. मार्च २०२० पर्यंत सर्व एसटीमध्ये व्हीटीएस बसवून, त्यावर आधारित कम्युटर ॲप प्रवाशांच्या सेवेत आणण्यात येणार होते. परंतु कोरोना आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहा महिन्यांच्या संपामुळे हे काम रखडले. तथापि, टाळेबंदीत शिथिलता मिळाल्यानंतर या कामाला पुन्हा सुरुवात झाली.

एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली. याद्वारे राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवण्यात येणार होते. त्यावर आधारित प्रवाशांच्या सुलभतेसाठी अद्ययावत एमएसआरटीसी कम्युटर ॲप लवकर विकसित करुन प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणार होते. त्यामुळे आरक्षित तिकिटावरील क्रमांक ॲपमध्ये टाकल्यास प्रवाशांना त्यांना अपेक्षित एसटी कुठे आहे, याची माहिती मिळू शकणार होती. एमएसआरटीसी कम्प्युटर ॲप अद्ययावत करण्याचे काम गेली दीड वर्ष रेंगाळले असून ते खरंच प्रवाशांच्या सेवेत येईल का? याबाबतीत शंका निर्माण झाली आहे.

एसटीच्या ३० विभागांतील २५१ आगारांमधील १५ हजार एसटीला व्हीटीएस यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. यात साध्या, निम आराम, वातानुकूलित बसचा समावेश आहे. तसेच सुमारे ५०० प्रवासी माहिती प्रणाली संच डेपो स्थानकांवर बसविले आहेत. एखादी एसटी स्थानकात किंवा आगारात वेळेवर पोहोचत नाही. त्या गाडीला अनेक कारणांमुळे उशीर होत असतो. त्याचा परिणाम अन्य सेवांवरही होतो. या यंत्रणेमुळे धावत असलेल्या एसटीचा ठिकाणा समजण्यास मदत होते. एखाद्या अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास त्याची माहितीही महामंडळाला समजते आणि त्यानुसार कारवाईही चालक व वाहकांवर करता येते. परंतु हे मोबाईल ॲप गेली दीड-दोन वर्ष रखडल्यामुळे यंदा देखील उन्हाळी सुट्टीच्या हंगामात आपल्या गावी अथवा पाहुण्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांना असेच नेहमी प्रमाणे रस्त्याच्या कडेला बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागणार आहे. दुर्दैवाने एसटीच्या अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे हे ॲप वेळेत विकसित होऊ शकत नाही, याचा फटका अनेक प्रवाशांना बसला आहे.

तिकीटांपासून वैद्यकीय मदत पोचविणे शक्य

प्ले स्टोअरवर एमएसआरटीसी कम्युटर ॲप उपलब्ध झाल्यावर ॲपमध्ये तिकीट आरक्षण, लोकेशन ट्रॅकिंग, बस मार्ग, महिला सुरक्षितता, मार्गस्थ गाडीत झालेला बिघाड, वैद्यकीय मदत आणि अपघात या आणीबाणीच्या वेळी प्रवाशांना मदतीसाठी सुविधा दिल्या जाणार आहेत. एसटी नियंत्रण कक्ष, पोलिस, रुग्णवाहिका यांना थेट फोन करण्याची सुविधा आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे व्हीटीएस यंत्रणा हाताळली जाते. त्यामुळेच बसचा ठावठिकाणा समजण्यास मदत होते. बसचा अपघात झाल्यास तातडीने मदत पोहोचविता येते. वाहक चालकावर नियंत्रण ठेवता येते.

प्रवाशांना ऑनलाइन अभिप्राय देण्याची सुविधा

प्रवाशांना ऑनलाइन अभिप्राय देण्याची सुविधाही या ॲपमध्ये आहे. तक्रारींमध्ये वाहक-चालक, बसस्थिती, बससेवा, ड्रायव्हिंग, मोबाइल ॲप असे वर्गीकरण केले आहे. प्रवाशांना संबंधित विषयाबाबत तक्रार देताना मोबाइल क्रमांक आणि वाहन क्रमांक ऑनलाइन नोंदवावा लागतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *