शहर

राज्यघटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजावू या – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

भारतीय राज्यघटनेने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुदृढ मनाच्या सर्व भारतीय नागरिकांना, व्यक्तीची जात, धर्म, सामाजिक किंवा आर्थिक स्थिती विचारात न घेता मतदानाचा अधिकार प्रदान केला आहे.

मुंबई :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुदृढ मनाच्या सर्व भारतीय नागरिकांना, व्यक्तीची जात, धर्म, सामाजिक किंवा आर्थिक स्थिती विचारात न घेता मतदानाचा अधिकार प्रदान केला आहे. २० मे २०२४ रोजी आपण सर्वांनी घराबाहेर पडून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होवू या, मतदान करू या, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील मतदारांना केले आहे.

सक्षम लोकशाहीसाठी मतदानाचा अधिकार

सक्षम लोकशाहीसाठी मतदान करण्याचा संविधानाने दिलेला महत्वाचा अधिकार लोकशाहीच्या विचारसरणीसाठी अतिशय गरजेचा आहे. कोणत्याही व्यक्तीला त्यांची जात, पंथ, धर्म किंवा सामाजिक स्थिती विचारात न घेता मतदान करण्याचा अधिकार असल्याने हा एक मानवी हक्क आहे. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीत मत व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. देशातील नागरिकांनी केलेले मतदान लोकशाहीच्या भावनेचे समर्थन करते आणि त्यांना देशाचे भविष्य आणि त्याद्वारे त्यांचे स्वतःचे भविष्य निवडण्यात भाग घेण्याची परवानगी देते. जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचा लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभाग घेवून मतदानाचा हक्क बजवता यावा यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ‘स्वीप’च्या माध्यमातून मतदारांमध्ये वेळोवेळी जनजागृती करण्यात येत असल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले.

‘स्वीप’च्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या २६ मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ अंतर्गत विविध मतदारांमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, नवमतदार तसेच मतदानाच्या हक्कापासून एकही मतदार वंचित राहु नये यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि मतदान केंद्र अधिकारी यांच्या माध्यमातून सातत्याने मार्गदर्शन करण्यात येत आहे.

आंबेडकर जयंतीदिनी मतदार जागृती कार्यक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतांना नागरिकांना संविधानांतर्गत जो अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराची सकारात्मक अंमलबजावणी व्हावी म्हणून १५३ दहिसर विधानसभा मतदारसंघ कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी निवडणुकीदरम्यान कर्तव्य बजावत असतांना टपाली मतपत्रिकाद्वारे (पोस्टल बॅलेट) मतदान करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गास शपथ देण्यात आली.

१६९ घाटकोपर पश्चिम विधनसभा मतदारसंघ येथे दिव्यांग मतदारांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील दिव्यांग मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. २९ मुंबई उत्तर मध्य मतदान संघ अंतर्गत विलेपार्ले मतदार संघ १६७ च्या वतीने गौतम नगर, चकाला, अंधेरी पूर्व येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या पथनाट्यामध्ये महाविद्यालयातील युवक व युवतींनी सहभाग घेतला. याचबरोबर १६३, गोरेगाव, टोपीवाला चौकी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जमलेल्या कर्मचारी व नागरिकांनी मतदान करण्याची शपथ घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *