मुंबई :
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वंधत्व जोडप्यांना अपत्य प्राप्तीचा आनंद घेता यावा यासाठी केईएम रुग्णालयामध्ये कृत्रिम गर्भधारणा केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होती. मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेचा फटका या केंद्राच्या कामाला बसला आहे. त्यामुळे कृत्रिम गर्भधारणा केंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांच्या खरेदीची प्रक्रिया रखडली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासाकडून देण्यात आली.
विवाहानंतर अनेक वर्षांनंतरही ज्या जोडप्यांना माता-पिता होण्याचे भाग्य लाभत नाही, अशी जोडपी बाळ व्हावे यासाठी बरेच प्रयत्न करतात. मात्र त्यांना अपत्य प्राप्ती होत नाही. अशा जोडप्यांसाठी कृत्रिम गर्भधारणा केंद्र वरदान ठरत असले तरी या केंद्रामधील उपचार आणि औषधांचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये कृत्रिम गर्भधारणा केंद्र सुरू करण्यात येत आहे. केईएममधील कृत्रिम गर्भधारणा केंद्रासाठी रुग्णालयाचे माजी विद्यार्थी डॉ. अनिरुद्ध मालपानी आणि डाॅ. अंजली मालपानी या जोडप्यांनी पुढाकार घेतला आहे. या केंद्रासाठी आवश्यक असणारी दोन यंत्रे आणण्यात आली असून, लवकरच त्याचे उद्घाटनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती. या केंद्रामध्ये सोनोग्राफी विभाग, लघु शस्त्रक्रियागृह, शुक्राणू गोठवणे विभाग असे विविध विभाग असणार आहेत. त्यासाठी आवश्यक साधनसामुग्री खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र आचारसंहितेमुळे खरेदी प्रक्रिया थंडावली आहे. परिणामी केईएम रुग्णालयातील कृत्रिम गर्भधारणा केंद्राचे कामही थंडावले आहे.
आयव्हीएफ केंद्रासाठी लागणारी सर्व साहित्य पुढील पाच वर्षे मालपानी यांच्याकडून पुरविण्यात येणार आहेत. तसेच केंद्रामधील सर्व डॉक्टर, कर्मचारी यांना प्रशिक्षण मालपानी यांच्याकडून देण्यात येणार आहे.