आरोग्य

वाढत्या उन्हाचा पक्षी व प्राण्यांनाही त्रास

१ एप्रिलपासून १०० पेक्षा अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल

मुंबई : 

काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. आता या वाढत्या उन्हाचा फटका पक्ष्यांनाही बसू लागला आहे. १ एप्रिलपासून मुंबईमध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त पक्षी व प्राण्यांना उन्हाचा त्रास झाला असून, दररोज साधारणपणे १० पक्षी रुग्णालयात दाखल होत आहेत. वाढत्या उन्हाळा उन्हामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन ते झाडावरून किंवा उडताना अचानक खाली पडून जखमी झालेले आहेत. तसेच प्राण्यांही निर्जलीकरणाचा त्रास होत आहे.

एप्रिल महिना सुरू झाल्यापासून मुंबईसह राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. दुपारी अंगाची लाही लाही होत आहे. आतापर्यंत उष्माघाताचा ७७ जणांना त्रास झाला आहे. माणसांप्रमाणे पक्षी व प्राण्यांनाही या उन्हाचा त्रास होत आहे. १ एप्रिलपासून मुंबईमध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त पक्षी व प्राण्यांना वाढत्या उन्हाचा त्रास झाला आहे. यामध्ये ४० गाई असून, काही श्वानांना निर्जलीकरणाचा त्रास झाला आहे. तर जवळपास ५८ पक्षी जखमी झाले आहेत. यामध्ये कबूतर २२, कावळे १६, पोपट १, मैना २, घारी १७ यांचा समावेश आहे. वाढत्या तापमानामध्ये या पक्ष्यांना पाणी न मिळाल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन ते निपचित अवस्थेत पडलेले पक्षीप्रेमी व स्वयंसेवकांना आढळले आहेत. यातील काही पक्षी शरीरातील पाणी कमी झाल्याने झाडावरू किंवा आकाशात उडताना अचानक खाली पडून जखमी झाले आहे. या पक्षी व प्राण्यांवर परळ येथील ‘दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अ‍ॅनिमल’ (बैलघोडा हॉस्पिटल) या रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. रुग्णालयामध्ये दररोज साधारणपणे १० ते १२ पक्षी वाढत्या उष्णतेचा त्रास झाल्यामुळे उपचारासाठी दाखल होत आहेत. निर्जलीकरणाचा त्रास झालेल्या पक्ष्यांवर उपचार करून त्यांना दोन दिवसांत सोडण्यात येते. तर जखमी झालेल्या पक्ष्यांवर बरेच दिवस उपचारासाठी दाखल करून घेण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी दिली.

निर्जलीकरणाचा त्रास झालेल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था

ज्या पक्ष्यांना निर्जलीकरणाचा त्रास होत आहे, अशा पक्ष्यांना सलग दोन दिवस ग्लुकोजचे पाणी पाजण्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही व्यक्ती आठ तासांतून तीन ते चार वेळा त्यांना ग्लुकोजचे पाणी पाजते. तसेच त्यांची व्यवस्थित काळजी घेते.

मोठ्या जनावरांसाठी ही काळजी घ्या

गायीला निर्जलीकरणाचा त्रास होऊ लागल्यावर त्यांना श्वास घेण्यास त्रास होणे, त्यांच्या नाकाचा भाग सुकतो, तसेच त्यांचे डोळे बाहेर येतात. गाय, बैल, घोडा, म्हैस यासारख्या मोठ्या जनावरांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या अंगावर गोण्या भिजवून टाकाव्यात. यामुळे त्यांना थंडावा मिळतो.

अशी घ्या प्राण्यांची काळजी

तापमान वाढीचा परिणाम प्राण्यांवर होत असल्याने त्यांना उन्हाळ्यात घरामध्ये ठेवा. घरामध्ये ठेवणे शक्य नसेल, तर त्यांना सावलीच्या ठिकाणी ठेवा. प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवू नका, कारण ते उष्ण हवामानात लवकर जास्त गरम होतात. प्राण्यांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवा. त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी द्या. उन्हात गरम झालेले पाणी किंवा अस्वच्छ पाणी पिण्यास देऊ नका, यामुळे प्राण्यांना उष्णतेचा जास्त फटका बसणार नसल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले.

पुढील काळामध्ये तापमान वाढल्यास याचा फटका पक्षी व प्राण्यांना अधिक बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळावे, त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी घराच्या छतावर, गच्चीवर पाण्याची व्यवस्था करावी.
– डॉ. मयूर डांगर, व्यवस्थापक, दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अ‍ॅनिमल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *