मुंबई :
दोन महिन्यांपासून ओटीपोटात दुखत असलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करत कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी ४४ वर्षीय महिलेच्या पोटातून जवळपास २२ सेंटीमीटरचा गोळा काढण्यात यश मिळवले. या महिलेची प्रकृती उत्तम असून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
कुलाबा येथील लाला निगम रोडवरील दर्या नगर येथे राहत असलेली ४४ वर्षीय महिला राधा राजू नमल्लू यांच्या पोटामध्ये मागील दोन महिन्यांपासून सातत्याने दुखत होते. तिने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र थोड्या दिवसांनी तिचे पाय दुखू लागले. त्यामुळे तिने परिसरातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार सुरू केले. त्यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र तिच्या पोटातील दुखणे काही केल्या थांबत नव्हते. त्यामुळे या महिलेच्या गर्भाशयाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठी गाठ असल्याचे आढळून आले. गर्भाशयात गाठ असल्याने ही महिला कामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर या महिलेचे सीटी स्कॅन करण्यात आले. यामध्ये महिलेच्या गर्भाशयामध्ये २२ x २० x १८ सेंटीमीटर इतकी गाठ असल्याचे आढळून आले. त्यामुळे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी तातडीने या महिलेची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून या महिलेच्या गर्भाशयातून ही गाठ काढण्यात आली. यावेळी महिलेच्या शरीरातून जवळपास पाच लिटर इतके द्रव कचरा बाहेर काढण्यात आला. त्यानंतर या महिलेला अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर तिला सर्वसाधारण कक्षामध्ये हलविण्यात आले. महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर तिला सुखरूप घरी सोडण्यात आले.