आरोग्य

आपला दवाखान्यामध्ये होणार आता कान, नाक व घशावर उपचार

मुंबई महानगरपालिकेकडून अद्ययावत उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मुंबई :

मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये आता सर्वसाधारण आजारांबरोबरच नाक, कान, घसा यावरही उपचार होणार आहेत. यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून अद्ययावत उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही उपकरणे पुढील दोन ते तीन महिन्यांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेने १७ नोव्हेंबर २०२२ रोजी शहर आणि उपनगरांमध्ये प्रथमच ‘आपला दवाखाना’ सुरू केला. आतापर्यंत जवळपास २२६ ‘आपला दवाखाना’ आणि पॉलिक्लिनिक महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत याचा लाभ जवळपास ३० लाखांपेक्षा अधिक रूग्णांनी घेतला आहे. रूग्णांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून महानगरपाालिकेने आपला दवाखान्यातील आरोग्य सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तीन आपला दवाखानामध्ये फिजिओथेरपी सुविधा उपलब्ध करण्यात आली
असून लवकरच कान-नाक-घसा विभाग सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे.

आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कान, नाक, घशाची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये काही दवाखान्यांमध्ये ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच आपला दवाखानामध्ये एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची किंवा अन्य मोठा आजार असल्याचे आढळल्यास त्याला महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *