मुंबई :
नवजात बालकांची तेलंगणा, आंध्र प्रदेश व राज्यातील विविध भागांमध्ये विक्री करणाऱ्या डॉक्टरसह सहाजणांच्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखा कक्ष २ च्या पोलिसांनी अटक केले आहे. अटक केलेल्या आरोपींविरोधात विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंदना पवार (२८), शीतल वारे (४१), स्नेहा सुर्यवंशी (२४), नसीमा खान (२८), लता सुरवाडे (३६), शरद देवर (४५) आणि डॉ. संजय खंदारे (४२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. १३ डिसेंबर २०२२ रोजी विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर येथून कांता पेडणेकर यांच्या पाच महिन्याच्या बाळाची शीतल वारे हिने विक्री केल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष २ च्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करत पोलिसांनी वारे हिला गोवंडी येथून ताब्यात घेत तिची चौकशी केली. पेडणेकर यांच्या पाच महिन्यांच्या बाळाची डॉ. संजय खंदारे व वंदना पवार यांच्या माध्यमातून यांनी संजय पवार, सविता पवार यांना दोन लाखांमध्ये विकल्याची कबूली दिली. संजय खंदारे व वंदना पवार यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी रत्नागिरीतील गुहागर येथून संजय व सविता यांच्याकडून बाळाला ताब्यात घेतले. तसेच शीतल वारेच्या चौकशीत तिने शरद देवर आणि स्नेहा सुर्यवंशी यांच्या मदतीने दोन वर्षांच्या मुलीची अडीच लाखांत लिजेंद्र शेट्टी यांना विक्री केल्याचे आढळले. या दोन्ही बालकांची सुटका करून त्यांना बाल आशा ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आले, तसेच सात जणांना अटक करण्यात आले.