मुंबई :
ईशान्य मुंबईतील शिवसेना (उबाठा) चे उमेदवार संजय पाटील यांनी ३० एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र त्यापूर्वीच त्यांनी मतदार संघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून बैठका सत्र सुरू केले आहे. यामध्ये विशेषत: तरुणांनी मतदानासाठी पुढे यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
मतदारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आपली बाजू समजवून सांगता येते. या विचाराशी सहमत असलेल्या शिवसेना (उबाठा) च्या संजय पाटील यांनी काेणत्याही समाज माध्यमांऐवजी पारंपरिक पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली आहे. हा प्रचार करताना त्यांनी शाखांच्या माध्यमातून मतदार संघातील युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यासाठी त्यांनी शिवसेना शाखेतील शाखाप्रमुख, उप शाखाप्रमुख, गटप्रमुख यांच्या माध्यमातून युवा मतदारांसोबत बैठका सत्र सुरू केल्या आहेत. आतापर्यंत जवळपास १०० पेक्षा जास्त बैठका शाखांच्या माध्यमातून घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये युवा मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. मतदान हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे हा हक्क बजावण्यात यावा, तुम्हाला आवडेल त्या उमेदवाराला मतदान करा परंतु मतदानाचा हक्क बजावण्यात यावा, असे आवाहनही संजय पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे.