आरोग्य

भाभा रुग्णालयातील परिचारिकांच्या सुरक्षेसाठी महिनाभरात उपाययोजना करा; अन्यथा काम बंद आंदोलन करू

महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचा इशारा

मुंबई :

कुर्ला येथील मुंबई महानगरपालिकेच्या भाभा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला मारहाण झाल्याप्रकरणी गुरूवारी परिचारिकांनी जोरदार निदर्शने केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वंतत्र समिती नेमणे, तसेच असे प्रसंग पुन्हा घडू नयेत यासाठी नियमांची महिनाभरात अमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा सर्व महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिका काम बंद आंदोलन करतील असा इशारा महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला गुरूवारी रात्री महिला रुग्ण व तिच्या कुटुंबियांनी मारहाण केली. रुग्णालयामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर व परिचारिकांवर वारंवार हल्ले होत असतात. यावरून रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा कमकुवत असल्याचे स्पष्ट होते. तसेच यातून प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो, असा आरोप महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला आहे. रुग्णालयातील कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येते. मात्र रुग्णांना भेटण्याची वेळ नियंत्रित केली जात नाही. एका रुग्णाला भेटण्यासाठी अनेक नातेवाईक एकाचवेळी कक्षात शिरतात. त्यामुळे रुग्ण कक्षात असलेल्या परिचारिकांना रुग्णसेवा देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर कुर्ला भाभा रुग्णालयातील घडलेला प्रकार हा निंदनीय असून, त्याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात यावी, तसेच संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. भागा रुग्णालयात असे प्रसंग पुन्हा घडू नयेत यासाठी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थापन बदलणे व त्या अनुषंगाने रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या संख्या ठरविणे, वेळ निश्चित करणे हे नियम सुरक्षा विभागाने तंतोतंत पाळणे आवश्यक आहे. तसेच ज्या परिचारिकेवर हल्ला झाला आहे, तिची उच्च अधिकाऱ्यांकडून समुपदेशन करणे आवश्यक आहे. रुग्णालयातील परिचारिका व डाॅक्टरांवर हाेणारे हल्ले रोखण्यासाठी सुचविण्यात आलेल्या या उपाययोजनांची एका महिन्यांत अमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा महानगरपालिका रुग्णालयातील सर्व परिचारिका काम बंद आंदोलन करतील, असा इशारा महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी दिला.

अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त (मनपा सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, सार्वजनिक आरोग्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, महानगरपालिकेचे प्रमुख सुरक्षा अधिकारी यांना महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून यासंर्भातील पत्र देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *