आरोग्य

जागतिक उच्चरक्तदाब दिन : आपला रक्तदाब मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घायुष्य जगा”

मुंबई :

जागतिक स्तरावर उच्च रक्तदाब असलेल्या पैकी अंदाजे ४६ टक्के लोकांना हे माहित नसते की त्यांना उच्चरक्तदाब आहे. उच्च रक्तदाब असलेल्या सर्व प्रौढांपैकी अर्ध्यापेक्षा कमी लोकांचे निदान आणि उपचार केले जातात. उच्च रक्तदाब असलेल्या ५ पैकी केवळ १ प्रौढ व्यक्तीचा रक्तदाब हा नियंत्रणात असतो. त्यामुळे ८० टक्के लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अनियमित हृदय-ठोके आणि मूत्रपिंडाचे नुकसान यासह गुंतागुंत होण्याचा धोका असतो. जागतिक रक्तदाब दिन १७ मे २०२४ साठी यंदाचे वर्षीचे घोषवाक्य ‘आपला रक्तदाब मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घायुष्य जगा’ हे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेना आणि मुंबई महापालिकेमार्फत मुंबईमध्ये २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे ३४ टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचे नोंदवले आहे. त्यापैकी ७२ टक्के नागरिक हे सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले. उपचार घेणाऱ्या नागरिकांपैकी फक्त ४० टक्के नागरिकांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याचा आढळून आले. सरासरी दैनंदिन मिठाचे सेवन ८.६ ग्रॅम इतके असल्याचे आढळून आले आहे, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीपेक्षा जास्त आहे.

महापालिका दवाखाना व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे प्रत्येक महिन्यात ६० ते ७० हजार नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात येते. सुमारे १ लाख दहा हजार रुग्ण नियमितपणे उच्चरक्तदाब संदर्भातील उपचार घेत आहेत. तसेच ३० वर्षेपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची अधिकाधिक सक्षमरीत्या चाचणी करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या २६ रुग्णालयांमध्ये ऑगस्ट २०२२ पासून मधुमेह व उच्चरक्तदाब तपासणी केंद्र (NCD Corners) सुरु केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत ३ लाख ५० हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी ९.७ टक्के व्यक्तिमध्ये उच्चरक्तदाब संशयित आढळून आले. या सर्व व्यक्तींना संपर्क साधून, पाठपुरावा करून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

जानेवारी २०२३ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्तींमध्ये, आरोग्य स्वयंसेविका, आशा सेविका यांच्यामार्फत ३० वर्षांवरील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत अंदाजे १८लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे, त्यातील १७ हजार व्यक्तीना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले आहे व उपचाराधीन आहेत. तसेच आतापर्यंत २१ हजार उच्चरक्तदाब रुग्णांना आहार आणि दैनंदिन जीवनशैली संदर्भातील समुपदेशन करण्यात आले आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मधुमेह आणि उच्च रक्तदाब विषयक आरोग्य चाचणी करून उपचार घेण्यासाठी मुंबईकरांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *