शहर

कामा रुग्णालयामध्ये मियावाकी पद्धतीने तीन वर्षांत लावली ११ हजार झाडे

मुंबई :

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला प्रतिबंध करण्याला हातभार लावण्याच्या उद्देशाने कामा रुग्णालयामध्ये मियावाकी पद्धतीने तीन वर्षांमध्ये ३० हजार स्क्वेअर फुटाच्या जागेवर १० ते ११ हजार झाडे लावली आहेत. यामध्ये भारतीय पद्धतीची ४६ प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.

मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून उपाययोजन करण्याबरोबरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र प्रदूषण रोखण्यामध्ये वृक्ष ही महत्त्वाची भूमिका निभावत असतात. त्यामुळे कामा रुग्णालयामध्ये मियावाकी पद्धतीने तिसरे उद्यान उभारण्याचे काम १ मे २०२४ रोजी हाती घेण्यात आले. ग्रीनझप ग्रो फाऊंडेशनच्या माध्यमातून ८ हजार स्क्वेअर फुटाच्या जागेवर हे उद्यान उभारण्यात येत आहे. यामध्ये अडुळसा, आवळा, दालचिनी, हिरडा, बदाम, फणस, कडीपत्ता, आंबा, कोकम, नागचाफा, करवंद, पिंपळ, शमी, सीता अशोक, सोनचाफा, सुपारी, तेजपत्ता, वड, रिठा, पारिजात, निरगुंडी अशी ४६ प्रजातींची देशी आणि आयुर्वेदिक गुण असलेली जवळपास २५०० झाडे लावण्यात आली आहेत. यापूर्वी कामा रुग्णालयात मियावाकी पद्धतीने दोन उद्याने उभारण्यात आली आहेत. यामध्ये जवळपास साडे आठ हजार झाडे लावण्यात आली आहेत, अशी माहिती ग्रीनझप ग्रो फाऊंडेशनचे संचालक अरदीप राठोड यांनी दिली.

झाडांची निगा राखणे, खते घालणे, झाडांना दिवसांतून दोन वेळा पाणी घालणे, योग्य पाणी पुरवठ्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे, यासाठी विशेष माळीची व्यवस्था केली आहे. झाडांना घालणाऱ्या पाण्यांचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी झाडांभोवती प्लास्टिकचे आवरण घालण्यात आले आहे, अशी माहिती कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

या वर्षात लावली दोन उद्याने

पहिले मियावाकी उद्यान हे २०२० – २१ मध्ये उभारण्यात आले. यावेळी १५ हजार स्क्वेअर फूट जागेवर तब्बल ७०२६ झाडे लावली. दुसरे मियावाकी जंगल हे २०२२ मध्ये उभारण्यात आले असून, त्यामध्ये ७ हजार स्क्वेअर फूट जागेवर १५०० झाडे लावण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *