मुंबई :
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ५८ हजार अर्ज आले आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज नागपूर औरंगाबाद आणि लातूर या जिल्ह्यातून आहेत तर, सर्वात कमी अर्ज हिंगोली रत्नागिरी आणि वाशिम जिल्ह्यातून आहेत. बी. एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ही २८ मे २०२४ रोजी होणार आहे.
बी. एस्सी. नर्सिंग हा इयत्ता बारावी (विज्ञान)नंतर ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. गतवर्षापासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएच- बी.एस्सी नर्सिंग सीईटी घेण्याचे निश्चित केले. गतवर्षी बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी राज्यातून ३१ हजार ३९७ अर्ज आले होते. यंदा त्यामध्ये वाढ झाली असून, यावर्षी तब्बल ५८ हजार ६३५ अर्ज आले आहेत. त्यामुळे बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये बी. एस्सी. नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. यंदा आलेल्या अर्जांमध्ये यामध्ये सर्वाधिक अर्ज नागपूरमधून ५ हजार ९३१ आले आहेत. त्या खालोखाल औरंगाबादमधून ४ हजार ३५३, लातूरमधून ३हजार ९९६, नाशिकमधून ३ हजार ६१२ तर नांदेडमधून ३ हजार ३३८ इतके अर्ज आले आहेत. तसेच सर्वाधिक कमी अर्ज हिंगोलीमधून ६९ रत्नागिरीमधून २१० आणि वाशिममधून २६२ अर्ज आले आहेत. मुंबई पुण्यासारख्या शहरांच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्रातून नर्सिंग अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची मोठी पसंती असल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये २ हजार ३७३ तर पुण्यामध्ये २ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे. राज्यात शासकीय ५ महाविद्यालयात २५० जागा आहेत. तर खासगी महाविद्यालयात ७ हजार ११० जागा आहेत.
तृतीयपंथीय ही होणार परिचारिका
बी. एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी आलेल्या ५८ हजार ६३५ अर्जांमध्ये यंदा प्रथमच तीन तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे. नाशिक, अहमदनगर आणि जालना या जिल्ह्यातून प्रत्येकी एक अर्ज आला आहे.
ब्रदर्स होण्यासही विद्यार्थी इच्छुक
राज्यातून मोठ्या प्रमाणात आलेल्या अर्जामध्ये सर्वाधिक अर्ज मुलींचे आहेत. मुलींनी ४३ हजार ७०५ अर्ज केले आहेत. तर मुलांचे १४ हजार ९२७ अर्ज आले आहेत. त्यामुळे ब्रदर्स होण्यासही विद्यार्थी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.