मुंबई :
दहावीच्या निकालात यंदाही लातूर पॅटर्नची चलती असल्याचे पाहायला मिळाले. राज्याचा मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाला असून त्यात राज्यातील ९ हजार३८२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला तर, राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. त्यात लातूर विभागातील सर्वाधिक १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण आहेत. मागील वर्षी राज्यातील १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण होते. त्यात १०९ विद्यार्थी लातूर विभागाचे होते, म्हणजे यंदाही लातूर विभागाने निकालावर आपला दबदबा कायम ठेवला आहे.
यंदा लातूर विभागानंतर छत्रपती सांभाजीनगर विभागातील ३२ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यानंतर पुणे विभागातील १० मुंबई विभागातील ८, अमरावती विभागाच्या ७, कोकण विभागातील ३ आणि नागपूर विभागाच्या एका विद्यार्थ्याने १०० टक्के गुण मिळवले आहेत. परंतु, १०० टक्के गुण मिळवण्यात लातूर विभागाचे विद्यार्थी प्रथम क्रमांकावर असले तरी एकूण निकालात लातूर विभाग सातव्या क्रमांकावर आहे.
राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांना कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण दिले जातात. गेल्या काही वर्षांपासून राज्य मंडळातर्फे बेस्ट ऑफ फाईव्हनुसार निकाल जाहीर केला जातो. यंदा अतिरिक्त गुणांचा लाभ घेऊन १८७ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळाले आहेत.