Uncategorized

मुंबई महानगरपालिका शाळांचा दहावीचा निकाल ९१.५६ टक्के

शिक्षण विभागाने दहावीच्या चांगल्या निकालाची परंपरा यावर्षीही राखली कायम

मुंबई : 

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने दहावीच्या चांगल्या निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल २७ मे २०२४) जाहीर झाला. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून एकूण १६ हजार १४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल ९१.५६ टक्के इतका लागला आहे.

महानगरपालिकेच्या ७९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यासह ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले ६३ विद्यार्थी आहेत. कुलाबा महानगरपालिका माध्यमिक शाळेमधील आयुष रामदास जाधव या विद्यार्थ्याने ९७.४० टक्के गुण मिळवून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर द्वितीय क्रमांक खेरवाडी मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेचा वरुण चौरसिया या विद्यार्थ्याने मिळविला असून, त्याला ९७.२० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तिसरा क्रमांक याच शाळेचा आदित्य वानखेडे या विद्यार्थ्याने मिळविला असून त्याला ९६ टक्के गुण प्राप्त झाले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त (शिक्षण) श्रीमती चंदा जाधव यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा दहावीचा निकाल वृद्धीसाठी नियोजन करुन विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोप्या व मोजक्या आशयावर आधारित ‘मिशन मेरिट पुस्तिके’ची निर्मिती करुन त्याचे वितरण केले. या पुस्तिका आणि त्यातील प्रश्न विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले. प्रश्न सोडविण्याचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक सराव व्हावा यासाठी डिसेंबर २०२२ पासून (विद्यार्थी नववीत असतानाच) दहावी परीक्षेच्या धर्तीवर शालेय स्तरावर पाच सराव प्रश्नपत्रिका पाहून व पाच सराव प्रश्नपत्रिका न पाहता अशा एकूण दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या.

महानगरपालिका शाळांचा दहावीचा विचार करता मार्च २०२० मध्ये ९३.२५ टक्के, मार्च २०२१ मध्ये १०० टक्के, मार्च २०२२ मध्ये ९७.१० टक्के, मार्च २०२३ मध्ये ८४.७७ टक्के व या वर्षी मार्च २०२४ मध्ये ९१.५६ टक्के निकाल लागला आहे. गत वर्षी ४२ शाळांचा १०० टक्के निकाल लागला. यावर्षीं मार्च २०२४ मध्ये ७९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. गतवर्षी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५३ होती. यंदा त्यामध्ये दहा विद्यार्थ्यांची वाढ होवून ही संख्या ६३ झाली आहे. सर्व उत्तीर्ण विद्याथ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱया मुख्याध्यापक, शिक्षकांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी अभिनंदन केले आहे.

सर्व शाळांना अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन देण्यात आले होते. तसेच अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देवून मार्गदर्शनही करण्यात आले. मुलांच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी वेळोवेळी दत्तक अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेण्यात आल्या. शिक्षकांसाठी, विद्यार्थासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती त्याठिकाणी तासिका तत्वावर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. पर्यवेक्षणीय अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन वेळोवेळी शिक्षकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *