आरोग्य

मॉन्सूनसाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज

मुंबई :

उन्हाचा तडाखा वाढत असताना यंदा पावसाचे आगमन वेळेत होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसापाठोपाठ साथीच्या आजारांमध्येही वाढ होते. त्यामुळे साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी मुंबईतील राज्य सरकारची तसेच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज झाली आहेत. साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी मुबलक औषधांबरोबरच काही खाटाही राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यातील आजारांसाठी सायंकाळी ४ ते ६ दरम्यान स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांना औषधे उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा साठा करण्यात आला आहे. देण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांना रक्ताचे अहवाल दोन तासांत मिळतील. यासाठी स्वतंत्र डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि सुरक्षारक्षकाची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्याशी संबंधित आजाराने त्रस्त असलेल्या कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. आयसीयूमध्ये काही खाटा राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच ३० खाटांचे कक्ष राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली.

पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांची तुकडी तसेच सर्व आवश्यक औषधे तयार ठेवली आहेत. साथीच्या आजारांसाठी ३० खाटा राखीव ठेवल्या आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास पावसाळी बाह्यरुग्णही सुरू करण्याची तयारी ठेवल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

पावसाळी आजारांचा सामना करण्यासाठी रुग्णालयाने सर्व प्रकरची तयारी केली आहे. सध्या अनेक कक्षांचे डागडुजीचे काम सुरू असल्याने राखीव खाटा ठेवल्या नाहीत. परंतु कोणत्याही रुग्णाला माघारी पाठवले जाणार नाही, असे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठात डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.

पावसाळ्यात साथीचे आजारांसाठी सर्व हिवताप, डेंग्यू, हेपेटायटीस, स्वाईन फ्लू अशा सर्व आजारांची औषधे तयार ठेवली आहे. तसेच रुग्ण वाढल्यास स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येईल, अशी माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.

लहान मुले उपचारासाठी येण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच लागणाऱ्या सर्व औषधांचा साठाही तयार ठेवला आहे, अशी माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *