शिक्षण

मुंबई विद्यापीठात सुरू होणार सायकल प्रशिक्षण अभ्यासक्रम

जागतिक सायकल दिनानिमित्त 'पेडल अप मुंबई ' सायकल रॅली आयोजित करण्यात आली

मुंबई :

मुंबई विद्यापीठाचे दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र व शारीरिक शिक्षण विभाग यांच्यासमवेत केंद्र शासनाच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयाचे महाराष्ट्र व गोव्याचे नेहरू युवा केंद्र व स्मार्ट कम्युट फाऊंडेशन, मुंबई यांच्या सहकार्याने आज जागतिक सायकल दिनानिमित्त ‘पेडल अप मुंबई ‘ सायकल रॅली आयोजित करण्यात आली. या सायकल रॅलीत ६०० पेक्षा जास्त सायकलस्वार सहभागी झाले होते.

“सायकल चालवा शहर वाचवा” या थीमवर आधारित ‘पेडल अप मुंबई’ ही सायकल रॅली मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूझ मधील विद्यानगरी येथील क्रीडा संकुल येथून सकाळी ७.२० मिनिटांनी सुरू झाली व बांद्रा कुर्ला संकुलातील सोफीटेल हॉटेल येथे समाप्त झाली.

सायकल प्रशिक्षण अभ्यासक्रम

आपल्या उद्घाटनपर भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले हरित शहर करण्यासाठी सायकलसाठी स्वतंत्र मार्गिका असणे आवश्यक आहे. सायकलिंगमुळे आरोग्य आणि पर्यावरणीय फायदे आणि शाश्वततेला चालना देण्यासाठी त्याची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. तसेच मुंबई विद्यापीठात दोन क्रेडिटचा ‘सायकल प्रशिक्षण अभ्यासक्रम’ सुरू करण्याबाबतही महत्त्वपूर्ण घोषणा केली. हा अभ्यासक्रम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) आरखड्यानुसार असेल. लवकरच सर्व विद्याशाखांमधील विविध अभ्यासक्रमामध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध होईल.या कार्यक्रमाने शैक्षणिक समुदाय, पर्यावरण तज्ज्ञ आणि सामान्य लोकांना यशस्वीरित्या एकत्र आणले आणि सायकलिंगला वाहतुकीचे शाश्वत माध्यम म्हणून प्रोत्साहन दिले आणि निरोगी, हरित शहराच्या दिशेने पाऊल टाकले.

जागतिक स्तरावर सायकल दिन

२०१८ पासून संयुक्त राष्ट्राच्या मान्यतेने जागतिक सायकल दिन जगभर साजरा केला जातो. शाश्वत विकास, आरोग्याला चालना देण्यासाठी सायकलिंगला प्राधान्य देण्यासाठी जागतिक स्तरावर सायकल दिन साजरा करण्यात येतो. मुंबईतील स्मार्ट कम्युट फाउंडेशन ही संस्था आरोग्यदायी वाहतुकीचे माध्यम म्हणून सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करीत आहे. या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी व गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष नादिर गोदरेज हे प्रमुख पाहुणे होते आणि नेक्सस मोबिलीटीचे सह-संस्थापक विनोद मित्तल, प्रसिद्ध पर्यावरणवादी पाशा पटेल, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे डीन प्रा. शिवराम गर्जे, नॉलेज रिसोर्स सेंटरचे संचालक डॉ. नंदकिशोर मोतेवार, नेहरू युवा केंद्राचे संचालक प्रकाश मनुरे, मुंबईची पहिली सायकल मेयर फिरोजा दादन, डॉ विश्वनाथ अय्यर, शारीरिक शिक्षण विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. वासंती कधीरावन व सीडीओईचे संचालक डॉ. संतोष राठोड हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *