आरोग्य

हॉटेल बाहेर तंदूर विकण्यावर आता बंदी

मुंबई :

हॉटेल व रेस्टॉरंटच्या बाहेर तंदूर विक्री करण्यावर मुंबई महानगरपालिकेने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने ‘आहार’ या हॉटेल संघटनेला नोटीस बजावली आहे.

शहरातील बांधकामांमुळे वाढते प्रदूषण व धूळ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षित आरोग्याच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ५ अंतर्गत रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वारावर किंवा परिसराबाहेर तंदूर ठेवण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने रेस्टॉरंट व हॉटेल मालकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. रेस्टॉरंट मालकांकडून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास रेस्टॉरंटचे परवाने जप्त करणे किंवा रद्द करण्याची कारवाई करणार असल्याची नोटीस महानगरपालिकेने ‘आहार’ला दिली आहे.

मुंबईतील रेस्टॉरंट व हॉटेल यांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. ज्या रेस्टॉरंट बाहेर तंदूर विक्री होत असल्याचे निदर्शनास आले, त्यांना तंदूर आत ठेवण्यास सांगण्यात येत आहे. मात्र सूचनांचे पालन न केल्यास तंदूर जप्त करण्यात येईल, त्यानंतरही सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास कठाेर कारवाईबरोबरच रेस्टॉरंटचे परवाने जप्त करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

रेस्टॉरंटच्या बाहेर तंदूर विक्री न करण्याबाबत सर्व रेस्टॉरंट मालकांना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली असून, त्याविराेधात कारवाई सुरू केली असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *