मुंबई :
हवामान बदलापासून ग्लोबल वॉर्मिंग ते जंगलतोडीपर्यंत तात्कालिक समस्या लक्षात घेऊन यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे – जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण, अशी आहे. २००० पासून दुष्काळाची संख्या आणि कालावधी २९ टक्क्यांनी वाढला आहे, यावर तातडीची उपाययोजना न केल्यास २०५० पर्यंत जगातील तीन चतुर्थांश लोकसंख्येवर दुष्काळाचा परिणाम होऊ शकतो असे भाकीत केले जात आहे.म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधून प्रसूती आणि स्त्री रोगासाठी प्रसिद्ध असलेल्या कामा व आल्बलेस रुग्णालयातील परिचर्या शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनिंनीअ धिक्षक डॉ. तुषार पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी मरीन ड्राईव्ह येथे ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशी घोषणा देत रॅली काढण्यात आली.
दीड वर्षाच्या कालावधीमध्ये रुग्णालयाच्या कॅम्पसमध्ये विविध प्रकारच्या जवळजवळ ११ हजार झाडांचे मियावाकी पद्धतीने रोपण करण्यात आले. करोना कालावधीमध्ये संपूर्ण जगाला भासलेली ऑक्सिजनची तीव्र गरज आणि भविष्यात जंगलतोडीमुळे वातावरणातील कमी होत चाललेला ऑक्सिजन याचा दूरगामी होणारा परिणाम लक्षात घेऊन डॉक्टर तुषार पालवे यांनी रुग्णालय परिसरात झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला. आज रुग्णालयाचे संपूर्ण कॅम्पस विविध प्रकारच्या हिरव्यागार झाडांनी बहरून गेलेले आहे. यामध्ये त्यांची दूरदृष्टी आणि जनजागृतीची आणि पर्यावरण संतुलनाच्या मोहिमेमध्ये आपला हातभार लावण्याची त्यांची भावना दिसून येते.
आज प्रत्येक व्यक्तीने अशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणमध्ये आपला सहभाग देणे गरजेचे आहे. तरच आपण दुष्काळ, वाळवंटीकरण यासारख्या भविष्यात उद्भवू पाहणाऱ्या भयंकर अशा समस्यांना थोपवू शकणार आहोत.
– डॉ. तुषार पालवे, अधीक्षक, कामा रुग्णालय