आरोग्य

पाच वर्षांमध्ये २० हजार लोकांनी तंबाखूला केला रामराम 

टाटा रुग्णालयाच्या ‘तंबाखू क्विट लाईन’ उपक्रमाला प्रतिसाद

मुंबई :

वाढत्या कर्करोगासाठी तंबाखू हे एक कारण असल्याने टाटा रुग्णालयाने पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘तंबाखू क्विट लाईन’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत पाच वर्षांमध्ये २० हजार नागरिकांनी तंबाखूचे सेवन करणे बंद केले आहे. त्यामुळे टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार फेब्रुवारी २०१९ मध्ये ‘तंबाखू क्विट लाईन’ उपक्रम सुरू केला. या उपक्रमांर्गत तंबाखूचे सेवन करणाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना तंबाखूपासून दूर करण्यात येते. देशामध्ये सुरू करण्यात आलेल्या चार ‘तंबाखू क्विट लाईन’ केंद्रांपैकी एक केंद्र खारघर येथील टाटा रुग्णालयाच्या ॲक्ट्रेक्ट केंद्रामध्ये सुरू केले आहे. यासाठी ॲक्ट्रेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि दीव-दमन येथील नागरिकांच्या समुपदेशानची जबाबदारी या केंद्रावर आहे. तर अन्य तीन ‘क्विट लाईन’ केंद्र हे दिल्ली, गुवाहाटी आणि बंगळूरू येथे सुरू केले आहेत. ‘तंबाखू क्विट लाईन’वर संपर्क साधण्यासाठी नागरिकांना १८००११२३५६ हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘क्विट लाईन’चे काम दोन पाळ्यांमध्ये चालते. तसेच या केंद्रावर नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी १६ तज्ज्ञांची तुकडी कार्यरत आहे. या क्रमांकावर दररोज एक हजारापेक्षा अधिक दूरध्वनी येत असल्याची माहिती टाटा मेमोरियल केंद्राच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजीचे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांनी दिली.

धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयात जायाचे नसते. त्यामुळे तंबाखू सेवनाची सवय सोडण्यासाठी दूरध्वनी हे एक प्रभावी माध्यम आहे. तंबाखूची सवय म्हणजे आजार असून, मानसिकता आहे. ही सवय सोडण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांची मदत घेण्याचा सल्ला देण्यात येतो, अशी माहिती क्विटलाइनचे प्रभारी आणि एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक डॉ. अतुल बुदुख यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *