मुंबई :
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई लोहमार्ग पोलीस यांच्या पाल्यांसाठी घाटकोपर आणि दादर येथे महिनाभर आनंदशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दररोज नित्यनियमाने संस्कार वर्ग, देशभक्तीपर गीत, गोष्टी, विविध खेळ,कार्यानुभव,बालनाट्य या वैविध्यपूर्ण उपक्रमांत सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
घाटकोपर येथील रेल्वे पोलीस मुख्यालयात आनंदशाळेचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. लहान मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच आनंदशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र देऊन कौतुक केले. तसेच डॉ. रवींद्र शिसवे यांनी लहानग्यांना गोष्टीरुपात एकीचे आणि नम्रपणा याचे महत्त्व सांगितले तसेच रोजच्या जीवनात कृतज्ञता व्यक्त करण्याचा सल्ला दिला. भविष्यात सुट्टीत पोलीस पाल्यांकरिता असे उपक्रम सातत्यपूर्ण राबविण्यात येतील असा मानस पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केला.