मुंबई :
मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठीच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. मंगळवार ११ जून २०२४ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही मुदतवाढ असून या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी ते संबंधित महाविद्यालयात अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीसाठी http://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे त्या महाविद्यालयांचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरणे देखील अनिवार्य आहे.
मुंबई विद्यापीठामार्फत प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, २५ मे २०२४ ते १० जून २०२४ या कालावधीत ऑनलाईन नाव नोंदणी ते संबंधित महाविद्यालयात अर्ज सादर करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र या कालावधीत एखाद्या विद्यार्थ्यांस काही अपरिहार्य कारणास्तव नोंदणी ते अर्ज सादर करण्यास उशीर झाला असल्यास त्यांना संधी मिळावी या उद्देश्याने ही मुदतवाढ दिली जात असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाच्या प्रचलित नियमानुसार व वेळापत्रकानुसार गुणवत्ता यादी ही त्या- त्या महाविद्यालयामार्फत जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.