शहर

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर मुंबई विद्यापीठाकडून स्वच्छता मोहिम

गड किल्ले जतन आणि संवर्धन विषयावर २ क्रेडिटचा अभ्यासक्रम

मुंबई : 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, विद्यार्थी विभाग आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रामार्फत रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मुंबई विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर गड किल्ले स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शिवस्मारक उत्सव समिती किल्ले रायगड आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या निमंत्रणाच्या अनुषंगाने या स्वच्छता मोहिमेअंतर्गत किल्ले रायगड आणि परिसरातील प्लास्टीक्स संकलन आणि कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थी, विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे कार्यक्रम अधिकारी हे या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आयोजित केलेल्या किल्ले रायगड स्वच्छ मोहिमेत प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे समन्वयक सुशील शिंदे आणि सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य सहभागी झाले होते. जिल्हा परिषद रायगड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या सहकार्यातून व मुंबई विद्यापीठाचे अधिकारी आणि गटविकास अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि देखरेखीखाली श्रमदान आणि स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबई विद्यापीठामार्फत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ७ जून रोजी विद्यापीठातर्फे किल्ले रायगड स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. शिवराज्याभिषेक उत्सव सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठामार्फत शस्त्रप्रदर्शन, अभिवादन रॅली आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गड किल्ल्यांची माहिती व्हावी, भव्य आणि ऐतिसहासिक किल्ले आणि वास्तूंपासून प्रेरणा मिळावी, ऐतिहासिक आणि समृध्दशाली वारसाचे जतन व संवर्धन व्हावे, किल्ले व परिसर स्वच्छ व सुंदर राहावे अशा व्यापक दृष्टिकोनातून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच राबवलेल्या या मोहिमेला विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विद्यापीठामार्फत गड किल्ले स्वच्छता मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे नजीकच्या काळात गड किल्ले जतन आणि संवर्धन यांवर २ क्रेडिटचा अर्थात ४५ तासाचा अनुभवाधारीत अभ्यासक्रम सुरु केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *