क्रीडा

राज्य कॅरम स्पर्धा : रहिम खान – काजल कुमारी अंतिम जेते

कोल्हापूर :

श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील अंतिम सामन्यात पुण्याच्या रहिम खानने आपले पहिले विजेतेपद पटकाविताना मुंबईच्या विश्व् विजेत्या संदीप दिवेवर १८-१६, २१-२० अशी सरळ दोन सेटमध्ये मात करत विजेतेपद पटकाविले. तर महिला गटात अंतिम सामन्यात माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या काजल कुमारीने विजेतेपद पटकविताना मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला अटीतटीच्या लढतीत २०-१६, १२-१९ व २१-१६ असे नमवून या गटाचे विजेतेपद पटकाविले.

पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत माजी विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेने मुंबईच्या संजय मांडेला २५-०, १४-१९ व २५-८ असे हरविले. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमवर २१-८, १४-२० व २१-१५ अशी मात केली.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुणे कुरुंदवाडी, कोल्हापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविराज फडणीस व कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा अडसूळ यांच्या शुभहस्ते चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी तालुका अधिकारी अभय देशपांडे, राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम संघटनेचे सचिव विजय जाधव, स्पर्धा प्रमुख हर्षद पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *