आरोग्य

गंभीर आजार असलेल्या २५८ रुग्णांना मिळाले जीवनदान

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाकडून १७ कोटी ६९ लाखांची मदत

मुंबई :

निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधि – न्याय विभाग अंतर्गत विशेष राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष सुरु केले आहे. या कक्षाच्या माध्यमातून कर्करोग, यकृत – मूत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो प्रत्यारोपणसारख्या गंभीर आजाराने त्रस्त २५८ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करुन त्यांना जीवनदान दिले. या शस्त्रक्रियांसाठी १७ कोटी ६९ लाख रुपयांची मदत या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

निर्बल आणि दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात आले आहेत. या राखीव जागांवर मोफत तसेच सवलतीच्या दरात चांगले उपचार मिळावे यासाठी जानेवारी २०२४ पासून राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांनी यात उत्साहाने सहभाग घेतला आहे. कर्करोग, यकृत – मूत्रपिंड प्रत्याराेपरण, बोनमॅरो प्रत्यारोपण, हृदय प्रत्यारोपण सारख्या गंभीर आजाराच्या शस्त्रक्रियासाठी लाखोंचा निधी लागतो. त्यामुळे हा खर्च सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर असतो. अशा रुग्णांना वैद्यकीय मदत आणि आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतात. जानेवारीमध्ये या कक्षाची स्थापना झाली असून मे महिन्यांपर्यंत म्हणजेच अवघ्या पाच महिन्यांमध्ये २५८ गंभीर आजार असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया करुन त्यांना जीवनदान देण्यात आले आहे. या शस्त्रक्रियांसाठी धर्मदाय रुग्णालय तसेच खासगी संस्थेच्या माध्यमातून २५८ रुग्णांना १७ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आला असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध योजना यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर या धर्मादाय योजनेस उपचाराच्या खर्चाची कोणतीही मर्यादा नसल्याने कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, हृदय प्रत्यारोपण अशा महागड्या शस्त्रक्रिया या योजनेतून निर्धन गटातील रुग्णास मोफत करण्यात येतात, त्यामुळे गोर-गरीब रुग्णांकरीता ही योजना वरदान असल्याचे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

लवकरच ऑनलाईन प्रणाली विकसित

सद्यस्थितीत कक्षाचे कामकाम ऑफलाईन पद्धतीने सुरू असून, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मदत मिळविण्यासाठी charityhelp.dcmo@maharashtra.gov.in या मेल आयडीवर किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देऊ शकतात. परंतु रुग्णांना धर्मादाय रुग्णालयातील राखीव जागा पारदर्शकपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्षासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना अर्ज करणे आणखी सोपे होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *