शहर

शिवसेना लागली विधानसभा निवडणुकीच्या कामाला

सदस्य नोंदणी, मतदार याद्या अद्ययावत करणे आणि शिवदूत नेमणुकीला प्राधान्य

मुंबई :

19 जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले राखले असून आता पूर्ण ताकतीने विधानसभेच्या तयारीला लागा असे निर्देश दिले.

यावेळी बोलताना शिंदे यांनी, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. मात्र या निवडणुकीत झालेल्या चूका सुधारून आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. 19जून या वर्धापनदिनापासून पक्षाची सदस्य नोंदणी पुन्हा सुरू करणे, आपापल्या विभागात मतदारांची नोंदणी करून मतदारयाद्या दुरुस्त करणे, तसेच विभागवार शिवदूतांच्या नेमणुका करणे याला प्राधान्य देण्यास सांगितले.

आपला स्ट्राईक रेट हा उबाठा सेनेपेक्षा उत्तम

या लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट हा उबाठा सेनेपेक्षा उत्तम होता. त्यांनी 22 जागा लढवून 9 जिंकल्या तर आपण 15 जागा लढवून 7 जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट हा 42 टक्के तर आपला 48 टक्के एवढा आहे. दुसरीकडे मुंबईत त्यांच्यापेक्षा 2 लाख जास्त मते आपल्याला मिळालेली आहेत. बाळासाहेबांचे छत्रपती संभाजीनगर आपण राखले असून कोकणातही जनतेने महायुतीलाच साथ दिलेली आहे. त्यामुळे जनता आपल्याला साथ देत आहे, असे असले तरीही महायुतीबद्दल या निवडणुकीत निर्माण झालेले चुकीचे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत पालटून टाकण्यासाठी आपल्याला अधिक जोमाने काम करावे लागेल असेही स्पष्ट सांगितले.

आपले सरकार हे डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी ‘संविधान बदलणार’ असे खोटे नेरेटिव्ह तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हे चित्र फार काळ टिकणार नाही. कारण केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील आपले सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. त्यामुळे आशा चुकीच्या नेरेटिव्हची आगामी विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही असा निर्धार व्यक्त करून कामाला लागण्याच्या सूचना शिंदे यांनी केली. तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीसहित,दहीहंडी, गणपती,दसरा,दिवाळी असे सर्व हिंदूंचे सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे करावेत असेही सांगितले. वारीला निघणाऱ्या पालख्यांचे पक्षाच्या वतीने जागोजागी स्वागत करावे तसेच त्यांची सोय करावी असेही आदेश दिले. तसेच गावागावात वाडी वस्तीवर शिवसेनेचे बोर्ड लागावेत, शाखा सुरू कराव्यात असेही सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *