क्रीडा

विफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा : ठाणे जिल्ह्याला ज्युनियर मुली गटात विजेतेपद

मुंबई :

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेच्या ज्युनियर मुली गटात ठाणे जिल्ह्याने बाजी मारली. तारापूर विद्या मंदिर मैदान, पालघर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा 1-0 असा पराभव केला. न्यासा बोंद्रेने केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला.

अंतिम लढत चुरशीची झाली. ठाणे आणि कोल्हापूर संघांनी प्रभावी आक्रमण आणि सुरेख बचावाची झलक पेश केली. मात्र, न्यासा हिने फ्री-किकवर 25 यार्डांहून केलेल्या अप्रतिम मैदानी गोलने ठाणे जिल्ह्याला आघाडीवर नेले. ही आघाडी कायम टिकवण्यात त्यांना यश आले. ठाण्याचा बचावही प्रभावी ठरला.त्यांचे हे पहिले आंतरजिल्हा जेतेपद आहे. तत्पूर्वी, तिसर्‍या स्थानासाठीच्या प्ले-ऑफ लढतीमध्ये पुणे जिल्हा संघाने रायगडचा 5-0 असा धुव्वा उडवला.

पुण्याने संपूर्ण वर्चस्व गाजवत त्यांचे श्रेष्ठत्व दाखवून दिले. अंतिम फेरीने हुलकावणी दिली तरी त्यांनी संपूर्ण स्पर्धेत अनेक मोठ्या विजयाची नोंद केली आहे. नांदेडवर 22-0 अशी मात करताना ठाणे संघाने विजयी सलामी दिली होती. दमदार फॉर्म कायम ठेवताना ठाण्याने उपांत्यपूर्व फेरीत नाशिकवर 3-0 असा विजय मिळवून अंतिम चार संघांतील स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीत कर्णधार हरलीन कौरच्या लेट गोल गोलमुळे पुणे संघाविरुद्ध त्यांना 0-1 असा पराभव पत्करावा लागला.

उपांत्यपूर्व फेरीतील अन्य लढतीत, कोल्हापूरने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या मुंबई जिल्ह्याला 1-0 असे हरवून आश्वासक सुरुवात केली. त्यानंतर यशस्वी घोडदौड सुरू ठेवताना उपांत्यपूर्व फेरीत पालघरला मागे टाकले. उपांत्य फेरीत कोल्हापूरने दमदार कामगिरी करत रायगडचा 3-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. प्रथमच जेतेपद पटकावलेल्या ठाणे जिल्ह्याची कर्णधार हरलीन कौर हिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याची आसावरी पाटील स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ठरली.

  • वैयक्तिक पुरस्कार : स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: हरलीन कौर (ठाणे).
  • सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : आसावरी पाटील (कोल्हापूर).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *