शहर

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज

आपला दवाखाना, रुग्णवाहिका, अतिदक्षता व हिरकणी कक्ष उपलब्ध

मुंबई :

वारकऱ्यांचा उत्सव असलेली आषाढी एकादशी १७ जुलै रोजी आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहे. या आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. आरोग्य विभागाने पालखी मार्गावर सहा हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी, आपला दवाखाना, फिरती रुग्णवाहिका पथके, आरोग्यदूत सज्ज ठेवली आहे. त्याचबरोबरच मुक्कामाच्या ठिकाणी अतिदक्षता कक्ष, हिरकणी कक्ष उपलब्ध केले आहेत.

विठूचा गजर करत राज्यातील विविध भागातून एक हजारांपेक्षा अधिक पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. यामध्ये साधारणपणे १२ लाखांपेक्षा अधिक वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी गतवर्षीपासून राज्य सरकारने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत यंदा वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालखी मार्गावर आरोग्य विभागाने ५ किमी अंतरावर आरोग्य सेवा उपलब्ध केली आहे. यासाठी ६ हजार ३६८ आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहेत. पालखी मार्गातील खासगी वैद्यकीय दवाखान्यात वारीतील रुग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अत्यावस्थ रुग्णांसाठी पाच खाटांचे अतिदक्षता कक्ष सुरू केले आहेत. पालखी मार्गावर ८७ अतिदक्षता कक्ष सुरू केले आहेत. महिला रुग्णांसाठी १५८ स्त्री रोग तज्ज्ञ विविध ठिकाणी सज्ज ठेवले आहेत. तसेच १३६ हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे १०२ आणि १०८ क्रमांकाच्या ७०७ रुग्णवाहिका २४ तास सेवा देण्यासाठी सज्ज ठेवल्या आहेत. दिंडी प्रमुखांसाठी ५ हजार ८८५ औषधांचे कीट उपलब्ध केले आहेत.

पालखी मार्गावरील २ हजार ७५२ पाणी स्रोतांचे सर्वेक्षण व निर्जंतूकीकरण करण्यात आले असून, पालखी मार्गावरील ७ हजार ९९१ हॉटेल, उपहारगृहे, धाबा येथील १९ हजार ५०२ कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. मार्गावर ठिकठिकाणी कीटकजन्य आजार सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करत, नागरिकांची असंसर्गजन्य आजारांची तपासणी, समुपदेशन व उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिली,

आपला दवाखाना वारकऱ्यांच्या सेवेत

वारकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी वारी मार्गामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने मुक्कामाच्या ठिकाणी तसेच प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखान्याची सुविधा उपलब्ध केली आहे. पालखी मार्गावर २५८ आपला दवाखाना उभारले आहेत. दिवेघाटामध्ये पायथ्याशी, मस्तानी तलाव आणि डोंगरमाथा असे तीन ठिकाणी आपला दवाखाना उभारण्यात आले आहेत.

महाआरोग्य शिबिरासाठी कर्मचारी नियुक्त

वारी मार्गादरम्यान वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. ही महाआरोग्य शिबिरे वाखरी, तीन रस्ता, गोपाळपूर या ठिकाणी भरवले जाते. वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभागाने ३ हजार ३६२ आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *