आरोग्य

केईएम रुग्णालयात शववाहिनी वाहनचालकांविना

दीड महिन्यांपासून सुविधा नसल्याने नागरिकांना आर्थिक भूर्दंड

मुंबई :

केईएम रुग्णालयामध्ये जीवन रक्षक प्रणाली धूळखात पडली असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता शववाहिनीही दीड महिन्यांपासून वाहनचालकाविना गॅरेजमध्ये धूळखात पडली आहे. शववाहिनी उपलब्ध नसल्याने रुग्णालयामध्ये मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला घरी नेण्यासाठी नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खासगी शववाहिनी चालकांकडून नातेवाईकांची मोठ्या प्रमारात लूट करण्यात येत असल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

केईएम रुग्णालयामध्ये मागील अनेक वर्षांपासून शवागारापासून मृतदेह घरपोच पोचविण्यासाठी महानगरपालिकेची मोफत शववाहिनी पुरवण्यात येत आहे. यासाठी केईएम रुग्णालयामध्ये दोन शववाहिनी होत्या. या दोन्ही शववाहिन्यांवर असलेले चालक निवृत्त झाल्यानंतर त्यावर चालकांची नियुक्ती करण्यात आली नाही. शववाहिनीसाठी चालक उपलब्ध नसल्याने दोन्ही शववाहिनी भायखळा येथील गॅरेजमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. दीड महिन्यांपासून शववाहिन्या नसल्याने ही सुविधा बंद झाली आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मृतदेह घरी नेण्यासाठी खासगी शववाहिनीची व्यवस्था करावी लागत आहे. केईएममधील शववाहिनी उपलब्ध नसल्याने खासगी शववाहिनी चालक हे नातेवाईकांकडून मनमानीपणे भाडे आकारत नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. मागील दीड महिन्यांपासून नातेवाईकांना होत असलेला त्रास लक्षात घेत या शववाहिन्या तातडीने रुग्णालयाच्या सेवेत आणाव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनाचे (उबाठा) माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिला आहे.

दरम्यान यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या परिवह विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी केईएम रुग्णालयामध्ये सध्या शववाहिनी व चालक उपलब्ध असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *