शहर

राज्यात मुंबईमध्ये हिवताप व डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण

आतापर्यंत हिवतापाचे १९४६ तर डेंग्यूचे ३८९ रुग्ण सापडले

मुंबई :

पावसाळा सुरू झाला की हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असली तरी वर्षभर या आजाराचे रुग्ण सापडत असतात. मागील सहा महिन्यांमध्ये राज्यात आढळलेल्या हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये हिवतापाचे १९४६ तर डेंग्यूचे ३८९ रुग्ण सापडले आहेत.

हिवताप व डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी विविध उपाययोजानांची अमलबजावणी केली जाते. तरीही हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये संख्येमध्ये वाढ होत आहे. मागील दोन वर्षामध्ये राज्यामध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यामध्ये २०२२ मध्ये हिवतापाचे १५ हजार ४५१ रुग्ण आढळले होते. तर २०२२ मध्ये १६ हजार १५९ रुग्ण सापडले. तसेच यावर्षी जूनपर्यंत ४ हजार ५२३ रुग्ण सापडले आहेत. राज्यामध्ये आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांमध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक १९४६ हिवतापाचे रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल गडचिरालीमधून १६५३ रुग्ण, चंद्रपूरमधून २१६ आणि पनवेलमधून १५१ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे गडचिरोलीमध्ये हिवतापाने तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

त्याचप्रमाणे राज्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येतही दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. राज्यात २०२२ मध्ये ८५७८ रुग्ण डेंग्यूचे सापडले होते, तर २०२३ मध्ये रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली. राज्यामध्ये २०२३ मध्ये १९ हजार ३४ इतके रुग्ण आढळले आहेत. तर यावर्षी आतापर्यंत २८०२ रुग्ण डेंग्यूचे सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक ३८९ रुग्ण सापडले असून, त्याखालोखाल पालघरमध्ये २२० रुग्ण, नाशिकमध्ये १९८ रुग्ण, कोल्हापूरमध्ये १९२ रुग्ण, रत्नागिरीमध्ये ११७ रुग्ण आणि नांदेडमध्ये १०१ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, वर्धामध्ये डेग्यूने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृतीवर भर

राज्यात हिवताप व डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यातही गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळच्या माध्यमातून आजारांबाबत लोकांपर्यंत माहिती पोहचवली जाते. प्रभात फेऱ्या, कार्यशाळा, प्रशिक्षण, वृत्तपत्रे, भित्तीपत्रे, वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमातून लोकापर्यंत पाेहोचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक कैलास बाविस्कर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *