मुंबई :
डेंग्यू आणि हिवतापाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने लघुपटाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘भाग मच्छर भाग’ या विशेष जनजागृती मोहिमेंतर्गत मराठी, हिंदी, चित्रपट सृष्टीतील अभिनेते तसेच सेलिब्रिटी, प्रसिद्ध व्यक्ती डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मुंबईकरांना आवाहन करणारा आहेत. अभिनेते व सेलिब्रिटींमार्फत करण्यात येणारे आवाहन हे संदेश व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केले जाणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेमार्फत पावसाळी आजाराबाबत जनजागृती करण्यासोबतच हिवताप आणि डेंग्यूबाबतीत विशेष उपाययोजना, उपक्रम राबविण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यासाठी मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते आणि सेलिब्रिटी, प्रसिद्ध व्यक्ती यांच्या मदतीने दृकशाव्य (व्हिडीओ संदेश) फिल्म, फोटो आदींच्या माध्यमातून जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या ‘भाग मच्छर भाग’या जनजागृती मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे व कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्ष शहा यांनी केले आहे.
‘भाग मच्छर भाग’ मोहिमेंतर्गत कोणता संदेश देणार
डेंग्यू आणि हिवताप हा डासांच्या माध्यमातून होणारा आजार आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावर डासांची उत्पत्ती ही आजाराचा प्रादुर्भाव आणि साथ वाढीचे मूळ कारण आहे. या डासांची उत्पत्ती स्थळे वेळीच नष्ट केली तर डेंग्यू व हिवताप आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असा संदेश मोहीमेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
मुंबई महानगरात जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘भाग मच्छर भाग’जनजागृती मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन हिवताप, डेंगीसारख्या आजारांचे मुंबईतून निर्मूलन करण्यास मदत करावी.
– डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका
हिवताप आणि डेंगी प्रतिबंधासाठी उपाययोजना
* नागरिकांनी घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचलेले असणार नाही, याची दक्षता घ्यावी. साचलेले पाणी आढळल्यास तात्काळ निचरा करावा.
* टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या व बाटल्यांची झाकणे, झाडांच्या कुंड्या व त्या कुंड्याखालील तबकडी, फ्रीजच्या खालील डिफ्रॉस्ट ट्रे यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
* फेंगशुई, मनी प्लांट यासारख्या शोभेच्या रोपट्यांचे पाणी नियमितपणे बदलावे.
* दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करावा.
* जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू जमा करणे टाळावे.
* ताप आल्यास जवळच्या हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुंबई महानगरपालिका रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा.