शहर

एसटीची झोळी रिकामीच; वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घडविणारी लालपरी अर्थसंकल्पात दुर्लक्षित

मुंबई :

अर्थ संकल्पात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये साठ पैसे प्रति लिटर कमी होणार आहे. मात्र डिझेलचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या एसटीला त्याचा काहीही फायदा मिळणार नाही.कारण एसटीच्या बहुतांश गाड्यांना ग्रामीण भागात डिझेल भरले जाते. राज्याच्या सर्वांगीण विकासात सर्वात मोठा वाटा असलेली व गेली ७६ वर्षे नित्य नियमाने वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घडविणारी एसटी म्हणजेच सर्वांची लाडकी एसटी निधीच्या तरतुदीपासून उपेक्षित राहिली असून एसटीला या करातून सूट मिळालेली नाही. त्याच प्रमाणे विकास कामांसाठी व नवीन गाड्या घेण्यासाठी अर्थसंकल्पात एक पैशाचीही मदत केली नसल्याची खंत महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली आहे.

मूल्यवर्धित कराबाबतीत बोलायचे झाल्यास मुंबई शहरात जादा कर आकारणी होत असल्याने एसटीने काही वर्षांपूर्वी मुंबईत डिझेल भरणे बंद केले असून नवी मुंबईत एसटीचा एकही डिझेल पंप नाही. मुंबई शहरातील मुंबई सेंट्रल व कुर्ला नेहरूनगर येथील दोन्ही डिझेल पंप बंद असून मुंबई – पुणे विना थांबा सेवा सुरू असल्याने फक्त परळ आगारात डिझेल पंप सुरू आहे. नव्या निर्णयामुळे बंद करण्यात आलेले दोन पंप पुन्हा सुरू होतील. मात्र एसटीच्या बहुतांशी गाड्यांना ग्रामीण भागात डिझेल भरले जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा डिझेलचा ग्राहक असलेल्या एसटीला डिझेलवरील करात सूट देण्यात आली पाहिजे. एसटीकडे सध्या १५ हजार ४०० गाड्या असून दररोज १२ लाख लिटर डिझेल लागते. त्यावर प्रती वर्षी साधारण ३४०० ते ३५०० कोटी रुपये इतकी रक्कम खर्च होते. एसटीची रचना ‘ना नफा ना तोटा’ व ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या तत्वावर आधारित असून मुळात एसटीला कुठलीच कर आकारणी नसावी, पण दुर्दैवाने साधारण विविध कराच्या रूपाने वर्षाला १२०० इतकी रक्कम एसटीला भरावी लागते. यातील राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या करांमध्ये सुट दिली असती तर बरे झाले असते. त्याचप्रमाणे नवीन विकास कामांसाठी व गाड्या घेण्यासाठी अजून निधी द्यायला हवा होता,पण दुर्दैवाने ते झालेले नाही.

गेल्या अर्थसंकल्पातील निधी अद्याप मिळाला नाही

गेल्या अर्थसंकल्पात स्थानक नूतनीकरण, एल.एन.जी.मध्ये गाड्या परावर्तित करणे त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनाना चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी व इतर बाबींसाठी एसटीला साधारण २२०० कोटी रुपयांची रक्कम तरतूद करण्यात आली होती. त्यातील फक्त ३९० कोटी रुपये इतकी रक्कम एसटीला शासनाने दिली आहे. जास्तीची रक्कम एसटीला अद्यापी मिळालेली नसून निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या व लोकप्रियतेसाठी इतर संस्थांना अर्थसंकल्पात मोठी तरतूद करणारे सरकार एसटीची मात्र वारंवार फसवणूक करीत असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *