मुंबई :
एसटीतील सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना विशेषतः चालक- वाहक व यांत्रिकी कर्मचारी यांना अनेक नियमांची पूर्णतः माहिती नसते, त्यामुळे त्यांच्याकडून अनवधानाने अनेक चुका होतात. या चुकांचा गैरफायदा घेऊन वरिष्ठ अधिकारी त्यांना आर्थिक दंड व इतर बडतर्फी सारख्या शिक्षा ठोठावतात. या सर्व बाबी अजाणतेपणी किंवा अनवधानाने कर्मचाऱ्यांच्या कडून घडत असतात. तत्पूर्वी या सर्व कर्मचाऱ्यांना विशेषतः चालक -वाहक व यांत्रिकी कर्मचारी यांना शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीची पूर्णतः माहिती व्हावी, यासाठी प्रशिक्षण दिले जावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. आज एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांना या संदर्भातील निवेदन संघटनेतर्फे त्यांच्या कार्यालयात देण्यात आले. निवेदनासोबत त्यांना “चालक प्रशिक्षण” वाहनाची आकर्षक प्रतिकृती सुद्धा देण्यात आली.
एसटीचा चालक- वाहक हा एसटीचा खरा चेहरा आहे. तो सर्वसामान्य प्रवाशांमध्ये रात्रंदिवस राबत असतो. कर्तव्यावर असताना अनावधानाने त्याच्याकडून ज्या चुका होतात, त्या चुकांची गंभीर शिक्षा त्याला त्याचे वरिष्ठ बजावतात. यामुळे कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा झालेल्या चुकीपेक्षा जास्त शिक्षा झाल्यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण होते. त्याच्या उत्पादकतेवर परिणाम होतो, त्याला नैराश्य येते. याचा परिणाम त्याच्या कामाच्या पध्दतीवर होतो. हे टाळण्यासाठी आणि कर्मचारी व अधिकारी यांचे संबंध सुधारण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेषतः चालक-वाहकांना त्यांच्याबाबतीत असलेल्या शिस्त व आवेदन कार्यपद्धतीची पुरेपूर माहिती करून देणे हे एसटी प्रशासनाचे महत्त्वाचे काम आहे. त्यासाठी त्यांना भोसरी पुणे येथील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत किंवा विभागीय पातळीवर प्रशिक्षण देण्यात यावे. त्या माध्यमातून त्यांना नव्या नियमांची व त्याद्वारे होणाऱ्या चुकांची आणि त्या चुकातून होणाऱ्या शिक्षेची माहिती कर्मचाऱ्याला होईल. यातून कर्मचाऱ्यांच्या मध्ये एक प्रकारची सतर्कता वाढून, चुका टाळण्याचे ज्ञान विकसित होऊ शकते. याचा थेट परिणाम त्याच्या कामासोबत उत्पादकता वाढीसाठी होऊ शकतो, असेही पदाधिकाऱ्यांनी या वेळी डॉ. कुसेकर यांना सांगितले.
या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष विजय बोरगमवार, कोषाध्यक्ष संतोष गायकवाड, विजय चंदनकर, विजय तंगुलवार, पराग शेंडे, विनोद दातार, मोतीशिंग चौहान, किशोर पाटील, योगेश उईके आदी पदाधिकारी उपस्थित होते.