मुंबई :
गणेशोत्सवाला आता काही महिने उरले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी गणेश मूर्तीचे कारखाने उभे राहिले आहेत. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशभक्तांच्या मनामध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ की ‘शाडू’ची मूर्ती असा द्वंद निर्माण झाला आहे. यावर कोकणातल्या डॉ. प्रसाद देवधर या प्रयोगशील आणि बहुउद्देशीय समाजसेवकाने ‘गोमय गणेश मूर्ती’ हा नवा पर्याय भक्तांसमोर ठेवला आहे. जो पूर्णपणे पर्यावरणपूरक असून, ज्यामुळे आपला संपूर्ण गणेशोत्सव हा आनंदमय होऊन परंपरा टिकवणारा ठरणार आहे.
गणेशोत्सवामध्ये घरी आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती घरी आणण्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. पण ही मूर्ती ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची असावी की शाडूच्या मातीच्या यावरून बराच खल होतो. प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडूच्या मातीमुळे वर्षानुवर्षे नदी, तलावांमध्ये गाळ निर्माण होऊ आपणच आपले जीवन धोकादायक बनवत आहोत, या जाणीवेने आपण नकळत गणेशोत्सवाचा आनंद सुरुवातीपासूनच किरकिरा करतो. हीच बाब लक्षात घेत कोकणातल्या डॉ. प्रसाद देवधर नावाच्या प्रयोगशील आणि बहुउद्देशीय समाजसेवकाने मागील दोन-तीन वर्षांमध्ये ‘गोमय गणेश मूर्ती’चा नवा प्रयोग केला आहे. ज्यामध्ये गाईचे शेण आणि शेतातली माती यांच्या सम प्रमाणातल्या मिश्रणावर योग्य व पर्यावरणपूरक प्रक्रिया करून, गोमय गणेशमूर्तींची निर्मिती केली आहे. या मूर्तीला शेणाचा कणभरही दर्प न राहता ती प्रसन्न सुगंधित असते. निसर्गाकडून मिळणारे आणि पुन्हा निसर्गातच विलिन होणाऱ्या या मूर्तीमुळे पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याबरोबरच देवत्वाची प्रचिती देणारे, मंगलमय-देखणं-पूजनीय गणेशरूप आपल्या घरात येऊन आपला उत्सव आनंदात साजरा होण्यास मदत होते.
डॉ. प्रसाद देवधरांचा या मूर्तीला कोकणामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोन वर्षांमध्ये कोकणातील हजारो नागरिकांच्या घरामध्ये या ‘गोमय गणेश मूर्ती’ची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे. तर बाहेर मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता या मूर्ती मुंबईत देखील उपलब्ध होणार आहे. मुंबईत नंदनी निमकर व मधूकाका शेंबेकर यांच्याशी संपर्क करावा ९८२२१२८६३०