मुंबई :
सरळसेवेने पद भरती करण्याबाबत कोकण आयुक्तांशी चर्चा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल. त्याचप्रमाणे अन्य मागण्यांसंदर्भात सविस्तर माहिती सरकारला पाठवून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि वैद्यकीय विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी दिल्यानंतर जे.जे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी रात्री संप स्थगित केला.
विविध मागण्यांसाठी जे.जे.रुग्णालय कर्मचारी संघटनेने बुधवारी सकाळीपासून बेमुदत संप पुकारला होता. या संपाची वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दखल घेत गुरूवारी सकाळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि जे.जे. रुग्णालय कर्चमारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये हसन मुश्रीफ यांनी सरळसेवेने रिक्त पदे भरण्यासंदर्भातील बिंदुमानावली तातडीने तयार करून कोकण आयुक्तांकडे याची माहिती पाठवून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश देण्यात येतील, तसेच रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांचे न्यायालयीन प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले. तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर माहिती व त्याचे विश्लेषण करून राज्य सरकारला पाठवण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्याचप्रमाणे रुग्णालय स्तरावरील प्रश्न हे तातडीने सोडवण्यात येतील, असे आश्वासन जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आयुक्त राजीव निवतकर यांनी मागण्या सोडवण्याबाबत दिलेल्या आश्वासनानंतर बुधवारपासून पुकारण्यात आलेला संप गुरूवारी रात्री जे.जे. रुग्णालय कर्मचारी संघटनेने मागे घेतला. संप मागे घेत तातडीने सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश दिले. त्यामुळे रुग्णालय परिसरात राहणारे कर्मचारी हे रात्री ८ वाजताच्या सुमारास कामावर रूजू झाले. तर रात्रीपाळीचे बहुतांश कर्मचारी हे कामावर रूजू झाल्याचे जे.जे. रुग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा रेणोसे यांनी सांगितले.
कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारणाऱ्या परिचारिकेची बदली
काही महिन्यांपूर्वी एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला परिचारिकेने कानाखाली मारले. त्यामुळे या परिचारिकेवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली होती. या मागणीची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने या परिचारिकेचे बदली अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात केली.