मुंबई :
विधिमंडळातील तृतीय पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आमदार भाई गीरकर यांनी विधान परिषदेत भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राचा मुद्दा मांडला. यामध्ये बोलताना १४१७ अंगणवाडी केंद्रे भंडारा जिल्ह्यात कार्यरत असून त्यापैकी १२४८ अंगणवाडी केंद्रे हे स्वमालकीच्या इमारतीत आहे. उर्वरित अंगणवाड्याना स्वमालकीची इमारत नाही असे सांगितले.
यावर उत्तर देताना मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडीच्या बांधकामासाठी जिथे जागा उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी त्या भाडे तत्त्वावर असतात. भाड्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीमध्ये सुद्धा या वर्षीपासून वाढ करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच ८०८४ नवीन अंगणवाडीचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावर बोलताना आमदार जयंत पाटील यांनी मुंबईतील काही अंगणवाड्यांना इमारत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच अनेक अंगणवाड्या या वर्गणी गोळा करून चालवल्या जातात हे देखील त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अंगणवाड्यांना भेट द्यावी आणि तिथली परिस्थिती समजून घ्यावी अशी विनंती केली.
यावर बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाजवी दरानुसार अंगणवाडीच्या जागेचे भाडे दिले पाहिजे असे शासनास सूचित केले. तसेच लवकरात लवकर राज्यातील अंगणवाड्यांना भेटी देणार असल्याचे सभापती डॉ. नीलम गोरे यांनी सांगितले.
विधिमंडळात साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शालेय विद्यार्थ्यांनी विधिमंडळाला अभ्यास भेट दिली. भिवंडी महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या मराठी, उर्दू, तेलगू आणि हिंदी या चार माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी विधिमंडळाला भेट दिली. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळातील उपसभापती कार्यालयात या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी या विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न डॉ. नीलम गोऱ्हे यांना विचारली, यावर डॉ. गोऱ्हे यांनी देखील विद्यार्थ्यांच्या या सर्व प्रश्नांची उत्तर दिली. खेळीमेळीच्या वातावरणात यावेळी हा संवाद विधिमंडळात पार पडला.