आरोग्य

मुंबई महानगरपालिकेतील ‘मार्ड’च्या डॉक्टरांचा काळ्या फिती लावून निषेध

मुंबई :

मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या बीएमसी मार्डने गुरूवारी हातावर काळ्या फिती लावून काम करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच रुग्णालय परिसरात डॉक्टरांनी जोरदार घोषणा ही दिल्या.

निवासी डॉक्टरांच्या तुलनेत अपुरी वसतिगृह, राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० हजार रुपये शिष्यवृत्ती वाढवण्याच्या घेतलेल्या निर्णयाची मार्च २०२४ पासून अमलबजावणी करावी, दैनंदिन भत्त्यामधील वाढ करावी, उपनगरीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या शिष्यवृत्ती वेतनातील तफावत दूर करण्यात यावी, २०१८ आणि २०१९ च्या तुकडीच्या वेतनातील थकबाकी तातडीने द्यावी, शीव रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या नाश्ताचा थकीत भत्ता तातडीने द्यावा, या मागण्यांसाठी बीएमसी मार्डने वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांना स्मरण पत्र देत, २२ जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर या चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ३५०० निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी सर्व डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले.

महानगरपालिकेच्या कासव गतीच्या कारभाराविरोधात नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी जोरदार घोषणा देऊन नाराजी व्यक्त केली. मागील चार महिन्यात वारंवार पाठपुरावा करून देखील मागण्या मान्य नाही झाल्या म्हणून आम्ही २२ जुलैपासून सामूहिक रजेचा निर्णय घेतला आहे.

– डॉ. अक्षय डोंगरदिवे, नायर मार्डचे अध्यक्ष तथा बीएमसी मार्डचे सरचिटणीस

दरवेळी निवासी डॉक्टरांना त्यांच्या हक्कासाठी आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे. हे खेदजनक आहे.

– डॉ. गौरव नाईक, अध्यक्ष, बीएमसी मार्ड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *