मुंबई :
प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची अफझाल खानाच्या वध करण्याप्रसंगीचा पुतळा तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ८ टन वजनाची आणि जवळपास १५ फूट उंचीची ही मूर्ती पुढच्या वर्षी पाहण्यासाठी महाराष्ट्रातील जनता मोठ्या संख्येने गर्दी करतील, असा विश्वास राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी व्यक्त केला. तर या पुतळा कोणत्याही प्रकारचा विरोध होऊ शकणार नाही, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा तयार करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून जे.जे.स्कूल ऑफ आर्टसची टीम काम करीत आहे. शिल्पकार दीपक थोपटे आणि जे.जे.स्कूलचे राजीव मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही टीम काम करीत असून बुधवारी या टीमचा विशेष सत्कार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात केला. त्यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी वरील विश्वास व्यक्त केला.
यावेळी मंगलप्रभात लोढा म्हणाले की, या मूर्तीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता लवकरच या मुर्तीच्या स्थापनेचे काम केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मी प्रतापगडाला गेलो होतो. त्यावेळी ही संकल्पना मांडली होती. जी आज पूर्ण होत आहे. इतिहासकार आणि तज्ज्ञांच्या टीमच्या सहकार्याने हा पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे लोढा यांनी यावेळी नमूद केले. तर निवडणुका लक्षात घेऊन या पुतळ्याचे काम केले जात असल्याचा विरोधकांचा आरोपही त्यांनी यावेळी फेटाळून लावला. जवळपास दीड वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली होती. त्यावेळी कोणतीही निवडणुका नव्हता. आपल्या भावी पिढ्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रेरणा पोहचविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला होता, असे त्यांनी यावेळी नमूद केले.