मुंबई :
वेळेत उपचार न मिळाल्याने सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या अनिश चौहान (३२) या कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी रुग्णालयातील तीन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची सखाेल चौकशी करण्यात येणार आहे.
सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये लघुशस्त्रक्रियागृहामध्ये कार्यरत असलेला अनिश चौहान याला दुपारी अचानक आकडी आल्याने तो खाली पडून त्याच्या डोक्याला मार बसला. त्यामुळे रक्तस्राव झाल्याने त्याला तातडीने सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या आपत्कालिन विभागामध्ये आणण्यात आले. यावेळी रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याला टाके मारण्यास विलंब झाला. दरम्यान टाके मारल्यानंतर त्याला डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. परंतु रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याला पुन्हा आकडी आली आणि त्याचा मृत्यू झाला. यामुळे अनिशचे नातेवाईक व त्याच्यासोबत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. अनिशला वेळेवर उपचार न मिळाल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता रुग्णालयातील अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. नबीला जबील, डॉ. गोकुळ भोळे आणि डॉ. भूषण वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
चौकशी समिती नेमली
मृत झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तातडीने चौकशी समिती नेमण्यात आली. या त्रिसदस्यीय समितीमध्ये जे. जे. रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. अजय भंडारवार, औषध वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या नागर आणि न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख तथा जी. टी. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भालचंद्र चिखलकर यांची समिती नेमण्यात आली आहे.
डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू
सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मागील काही दिवसांमध्ये चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप अनिश चौहानच्या कुटुंबीयांनी केला. नुकताच जानेवारीमध्ये सुद्धा डॉक्टरांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आयसीयूबाहेर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे चौहानच्या नातेवाईकांनी सांगितले.
चौकशीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी या प्रकरणी दोषी असलेल्या तिन्ही डॉक्टरांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
– राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष
रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपचार देण्याकडे डॉक्टर दुर्लक्ष करत असतील तर, सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने उपचार मिळत असतील याचा विचारच न केलेला बरा.
– योगेश वाघेला, मृत अनिश चौहानचा भाऊ