शहर

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबई महानगरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान

मुंबई : 

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार यंदा देखील ९ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीदरम्यान देशभरात हर घर तिरंगा अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथून होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आदींची या सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे

‘घरोघरी तिरंगा’ अभियान अंतर्गत दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत मुंबईमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. मुंबईकर नागरिकांनी राष्ट्राप्रतीच्या जाज्वल्य भावनेने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात स्वयंस्फूर्तीने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत नागरिकांनी आपापल्या घरावर स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून राष्ट्रीय ध्वज फडकवावा याकरीता प्रोत्साहित करण्यासाठी ‘घरोघरी तिरंगा’ अभियान सुरू करण्यात आले आहे. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता, आदर आणि दृढता वाढवणे ही अभियानाची मूळ संकल्पना आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ९ ऑगस्ट २०२४ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत राज्यात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे.

मुंबई महानगरातही हे अभियान व्यापकपणे आणि उत्साहाने राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. ‘घरोघरी तिरंगा’ अभियान अंतर्गत ९ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये (वॉर्ड) तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, मानवंदना सोहळा, तिरंगा मेळा, तिरंगा रॅली आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

९, ११, १३ आणि १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रत्येक विभागांत (वॉर्ड) निश्चित केलेल्या ठिकाणांहून तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. १०, १२ आणि १४ ऑगस्ट रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची सर्व २२७ प्रभागांमध्ये तिरंगा रॅली काढण्यात येईल. दिनांक १२ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येक विभाग आणि मंडईंमध्ये तिरंगा मेळा आयोजन करण्यात येणार आहे. या तिरंगा मेळामध्ये तिरंगा ध्वज, तिरंगा पदक (बिल्ले) आणि राष्ट्रीय प्रतिकांशी संबंधित वस्तू नागरिकांना खरेदी करता येतील. दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीदरम्यान मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांवर राष्ट्रध्वजाशी सुसंगत आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात येईल.

१३ ते १५ ऑगस्टदरम्यान फडकविणार ५०० राष्ट्रध्वज

९ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध विभागस्तरावर मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक, शूरवीर, त्यांचे कुटुंबीय यांचा सत्कार करुन मानवंदना देण्यात येईल. याच कालावधीत प्रत्येक विभागस्तरावर तिरंगा मॅरेथॉन (दौड/रॅली) अंतर्गत सायकल, दुचाकी किंवा कार रॅलीचे आयोजन करण्यात येईल. तर, १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीदरम्यान शासकीय/निमशासकीय आस्थापना, महत्वाच्या इमारतींवर व मोक्याच्या ठिकाणी मिळून प्रत्येक प्रभागांमध्ये ५०० राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी नागरिकांना तिरंगा शपथ देण्यात येईल. नागरिकांना या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल.

घरोघरी तिरंगा ध्वज फडकवा, सेल्फी अपलोड करा

मुंबईमध्ये ‘घरोघरी तिरंगा’ अभियान अत्यंत व्यापकपणे राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी ‘घरोघरी तिरंगा’ अभियान अंतर्गत वितरित केलेले राष्ट्रध्वज अथवा नवीन राष्ट्रध्वज प्राप्त करुन सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा. तसेच तिरंगा राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून https://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे.

मुंबईत १२५ ठिकाणी लावणार तिरंगा कॅन्व्हास आणि सेल्फी पॉईंट्स

मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा १२५ ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ९ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीदरम्यान तिरंगा कॅन्व्हास आणि सेल्फी पॉईंट्स लावण्यात येणार आहेत. कॅन्व्हासवर नागरिकांनी स्वाक्षरी करुन राष्ट्राप्रतीची आपली भावना व्यक्त करायची आहे. तसेच सेल्फी, छायाचित्रे किंवा व्हिडिओ काढून https://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *