शहर

महिलांनी आपापल्या परीने राष्ट्रीय भान ठेवून कार्य करावे – एसएनडीटी कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव

मुंबई : 

आधुनिक शिक्षण हे महिलांना सबलता देणारे असून शिक्षणातून सक्षम महिला घडवायच्या असतील तर महिलांचे कर्तृत्व हे त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे, `नारी तू नारायणी’ हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्येक स्त्रीने आपल्या परीने सामाजिक, राष्ट्रीय भान ठेवून कार्य केले पाहिजे, असे विचार एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केले.

विश्वभरारी फाऊंडेशन आयोजित भरारी प्रकाशनच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ येते आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना या लता गुठे यांनी लिहिलेल्या आणि संचित संस्कृतीचे या लेखिका स्मिता भागवत लिखित पुस्तकांचे प्रकाशन झाले. गेल्या ७ वर्षांत प्रकाशित झालेले भरारी प्रकाशनचे हे ३०० वे पुस्तक आहे. आमदार पराग अळवणी, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे, प्रकाशिका लता गुठे, माध्यम सल्लागार जयू भाटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

देशभक्ती हा रोजच्या जगण्यातील विषय आहे, प्रत्येकाने समाजासाठी आणि देशासाठी जेवढे काही करता येईल, तेवढे चांगले काम करावे, असे विचार आमदार एड. पराग अळवणी यांनी व्यक्त केले तसेच लता गुठे यांच्या प्रकाशन क्षेत्रातील कार्याचे कौतुक करत यापुढील पुस्तक `क्रांतिकारकांच्या घरच्यांचे जीवन’ या विषयावर प्रकाशित करण्यासाठी सुचवले.

`जगणं आमचं’ कार्यक्रमांतर्गत माध्यम सल्लागार जयू भाटकर यांनी विचारलेल्या मार्मिक प्रश्नांना वीरमाता अनुराधा गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेणुका बुवा आणि प्रकाशिका लता गुठे यांनी उत्तरे दिली. कॅ. विनायक गोरे यांच्या वीरमरणानंतर असंख्य विनायक तुझी वाट पहात आहेत, हे मुख्याध्यापकांचे वाक्य परिणाम करून गेले आणि क्षितिजामागून क्षितिजे उलगडत गेली, संकटात अदृश्य शक्ती साथ देते, असे विचार अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले तर शारिरीक आणि मानसिक फिटनेस हा पोलिसांच्या जीवनात आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत रेणुका बुवा यांनी २६-११ हल्ल्यात केलेल्या कार्याला आणि आठवणींना उजाळा दिला. मीच माझी गुरु आणि मीच माझी शिष्य या भावनेतून काम करून प्रकाशन आणि साहित्यिक क्षेत्रात आलेले अनुभव लता गुठे यांनी कथन केले.

डॉ. संपदा पाटगांवकर यांनी लता गुठे लिखित स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना पुस्तकातील उताऱ्याचे प्रभावी वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी केले. सायली वेलणकर यांनी प्रारंभी गणेश आणि शारदा वंदना सादर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *