आरोग्य

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जे.जे. रुग्णालयात पोलिस घालणार गस्त

मुंबई :

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दररोज रुग्णालय परिसरात गस्त घालून विशेष लक्ष द्यावे, तसेच त्याची नोंद ठेवावी, अशा सूचना दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता जे.जे. रुग्णालयात स्थानिक पोलिसांकडून नियमित गस्त घातली जाण्याची शक्यता आहे.

निवासी डाॅक्टरांच्या सुरक्षेसाठी जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या दालनात दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधिकारी, सुरक्षा समिती, महाराष्ट्र सुरक्षा बलचे प्रमुख, मार्ड संघटनेचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभागाचे अधिकारी व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या दरम्यान सुरक्षा कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक अलार्म, ओळखपत्र व रुग्णालयात वाढणारी गर्दी याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी देशमुख यांनी रुग्णालयीन अधिकारी, कर्मचारी, निवासी डॉक्टर, विद्यार्थी व सर्व कर्मचारी यांनी ओळखपत्र घालणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दररोज रुग्णालय परिसरात गस्त घालून जेथे गैरप्रकार होण्याचे शक्यता जास्त आहे, तेथे विशेष लक्ष देण्यास सांगितले. गस्त घातल्याची नोंद सुद्धा करण्यात यावी अशा सूचना त्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख व सर्व पोलीस अधिकाऱ्यांना संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणी रात्रीच्या वेळेस गस्त घालून गैरप्रकार टाळण्यास योग्य ते कार्यवाही करण्यास सांगितले. मार्ड प्रतिनिधी व सुरक्षा समितीने मांडलेल्या समस्यांवर देखील चर्चा करण्यात आली.

निवासी डॉक्टरांची सुरक्षा हेच आमचे प्राधान्य व त्यासाठी रुग्णालय प्रशासन योग्य ते पाऊले उचलेल. डॉक्टरांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करू.
– डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *